धुळे आगारातून नाशिक, जळगावसाठी शिवशाही बस

धुळे आगारातून नाशिक, जळगावसाठी शिवशाही बस

धुळे Dhule । प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांचा (ST employees) सातव्या दिवशी संप (strike) सुरुच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे आज धुळे आगारातून (Dhule Depot)नाशिक व जळगावसाठी शिवशाही बस (Shivshahi bus) पोलीस बंदोबस्तात (Police escort) सोडण्यात आली. प्रवाशांनी या सेवेला चांगला प्रतिसाद दिला. अन्य गावांसाठीही सुविधा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशी खासगी वाहनांची मदत घेत आहेत. परंतू खासगी वाहन चालक अव्वासव्वा भाडे आकारत असल्याने त्याची झळ प्रवाशांना बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काल नाशिकसाठी शिवशाही बस स्थानका बाहेरुन सोडण्यात आली होती. तर आज बारापत्थर चौकात प्रवाशांची गर्दी वाढल्याने धुळे बसस्थानकातून शिवशाही बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवशाही बस ही खासगी ठेकेदाराकडून महामंडळांतर्गत सोडण्यात येत आहे. परंतू बसवर खासगी सेवेतील चालक देण्यात आला आहे. परंतू वाहक नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. परंतू त्यावर धुळे आगारातून तोडगा काढण्यात आला.

धुळे बसस्थानकात शिवशाही बस लावण्यात आल्यानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी हरकत घेतली. त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने महामंडळाने पोलिसांची मदत घेतली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, पोलीस निरिक्षक दादासाहेब पाटील हे दाखल झाले. त्यांनी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांशी चर्चा केली व कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विरोध कमी झाल्याने प्रवाशी उपलब्ध झाल्यानंतरग नाशिक व जळगावसाठी शिवशाही बस सोडण्यात आली.

संप सुरुच ठेवण्याचा निर्धार

एकीकडे शासन एसटी कर्मचार्‍यांचा संप मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. तरी देखील कर्मचार्‍यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शासनात विलिनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला आहे.

अन्य गावांसाठी बसेस नाहीत

नाशिक व जळगावसाठी शिवशाही बस सोडण्यात आली यामुळे प्रवाशांची सोय झाली. परंतू अन्य गावांसाठी परिवहन महामंडळाकडून बस उपलब्ध करुन देण्यात न आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खासगी वाहनांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागला. यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले. शासनाने तोडगा काढावा अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com