धुळ्यात प्रथमच आढळला 'हा' दुर्मिळ पक्षी

धुळ्यात प्रथमच आढळला 'हा' दुर्मिळ पक्षी

धुळे | Dhule

येथील डेडरगाव तलाव परिसरात रविवारी अमूर ससाणा हा प्रवासी शिकारी पक्षी निसर्गवेध संस्थेच्या सदस्यांना दिसला. 'अमूर बाज' असे या पक्षाचे मराठी नाव आहे. अमूर फाल्कन (Amur falcon) हे पक्षी दक्षिण-पूर्व सायबेरिया आणि उत्तरी चीन या प्रदेशात मे-जून या कालावधीत प्रजनन करतात आणि त्यांचे मोठे थवे दरवर्षी हिवाळ्यामध्ये भारत (India) तसेच श्रीलंका (Srilanka) या देशात दाखल होतात आणि लगेच पुढील प्रवासाला निघतात...

अरबी समुद्रावरून 1 हजार फूट उंचीवरून प्रवास करीत ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत (South Africa) पोहचतात. हिवाळ्यात (Winter) तेथे त्यांचा मुक्काम असतो. त्यानंतर उन्हाळा (Summer) सुरू होताच ते माघारी फिरतात आणि त्याच मार्गाने उत्तरेच्या बाजूने पुन्हा मायदेशी पोहोचतात.

डेडरगाव परिसरात दिसलेला पक्षी हा अमूर ससाण्याची मादी होती. यावरून असे पक्षी मोठ्या संख्येने आले असावेत आणि त्यातला हा एक पक्षी मागे किंवा पुढे राहिला असावा असा याची शक्यता आहे, असे मत पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत (Dr. Vinod Bhagwat) यांनी व्यक्त केले.

धुळे जिल्ह्यात (Dhule District) यापूर्वी ६ डिसेंबर २०१९ रोजी नवापुर-पिंपळनेर मार्गावर उमारपाटा या ठिकाणी एक नोंद झालेली आहे. त्यानंतर या पाहुणे पक्षांची नोंद धुळे शहराजवळ परिसरात प्रथमच झाली आहे, असेही पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत म्हणाले.

हिवाळ्यात भारतात स्थलांतर करून येणाऱ्या शिकारी पक्षांपैकी अमूर ससाणा हा आकाराने कबूतरा पेक्षा थोडा लहान असतो. हे पक्षी टोळ, उधई (उदी), छोटे किटक हवेत उडताना पकडतात तसेच विणीच्या काळात प्रसंगी लहान पक्षी, प्राणी, किंवा बेडुक असे उभयचर जीवावर जगतात.

धुळे शहराजवळ दिसलेल्या या अमूर ससाणा पक्षाचे अनेक बाजूंनी फोटो काढून त्याची ओळख निश्चित झाली आणि त्याची सविस्तर माहिती फोटोसह, जगभरात पक्षी विषयक माहिती ठेवणाऱ्या ई-बर्ड या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे, अशी माहिती निसर्गवेध संस्थेचे संदिप बागल (Sandeep Bagal) यांनी दिली.

परदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्षांच्या हालचाली आणि वास्तव्याच्या नोंदी तसेच दुर्मिळ पक्षांची सुरक्षा व संवर्धन करण्यासाठी सर्व पक्षीप्रेमींनी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com