Photos # धुळ्यासह परिसराला पावसाने झोडपले

Photos # धुळ्यासह परिसराला पावसाने झोडपले

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरासह परिसराला गुरुवारी रात्री पावसाने झोडपून (Drenched with rain) काढले. यंदाच्या हंगामातील हा सगळ्यात जोरदार पाऊस (Heavy rain) असल्याची नोंद झाली. पावसामुळे नाल्यांना पूर(Flooding of drains) आला तर काही ठिकाणी फरशी उखडली गेली. शहरातील कॉलनी परिसरात मात्र पावसामुळे पूर्णतः दैना उडाली. संपूर्ण परिसरात जणू तलावच तयार झालेत. नकाणे रोड परिसिरातील काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले (Water entered the houses). शाळा, महाविद्यालयांच्या आवारातही गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली. शासकीय कार्यालयांचे आवारही जलमय झाले.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसाने सार्‍यांचीच तारांबळ उडवली. गुरुवारी दुपारी आभाळ स्वच्छ होते. काहीवेळ उनही जाणवले. मात्र सायंकाळनंतर आकाशात पावसाच्या काळ्या ढगांनी गर्दी केली. नेहमीप्रमाणे गरजणारे ढग हुलकावणी देतील असा सार्‍यांचाच अंदाज वरुणराजाने मात्र फोल ठरविला. रात्री 10 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अडीच तास पावसाने अक्षशः कहर केला. मुसळधार पावसाने पुर्णतः दैना उडाली. रात्रभर कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरुच होता.

कॉलन्या, घरांमध्ये शिरले पाणी

शहरातील नकाणेरोड परिसरात दरवर्षी पावसाळ्यात वसाहतींमध्ये पाणी शिरण्याची गंभीर समस्या जाणवते. पुर्वी या भागातून वाहत जाणारा एक नैसर्गिक नाला पूर्णपणे बुजून त्यावर घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे या भागातून नैसर्गीक प्रवाहाने वाहणार्‍या पावसाच्या पाण्याला वाट मिळत नसल्याने हे पाणी नकाणे रोड परिसरातील कॉलन्यांमध्ये शिरते. या भागातील योगेश्वर कॉलनी, स्वामीनगर, श्रीकृष्ण नगर, नेताजी ग्राऊंड परिसर, भरत नगर, तुळशिराम नगर, इंदिरागार्डन परिसर या भागांमध्ये रस्त्यांवर अक्षरशः पाठ वाहू लागलेत. काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त पाणी साचले.

योगेश्वर कॉलनीत तर घराबाहेर लावलेली दुचाकी वाहने पूर्णतः पाण्याखाली बुडाली. याच भागात काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. मिळेल त्या साधनाद्वारे रहिवाशांनी घरातील पाणी उपसून बाहुर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगणात आणि ओट्यावरही पाणी असल्याने रात्रभर घरात पाणी साचून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. आज सकाळी नागरिकांनी घरातून पाणी उपसून फेकण्याचे काम केले.

नैसर्गीक नाला बंद झाल्यामुळे निर्माण झालेली ही समस्या प्रत्येकवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरत असली तरी यावर अद्याप कोणीही ठोस पर्याय काढलेला नाही. पालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींना सांगुनही उपयोग होत नाही, अशी या भागातील रहिवाशांची तक्रार आहे.

शाळांमध्ये तलाव, विद्यार्थ्यांना सुट्टी

शहरातील भंगारबाजार परिसरात पालिकेच्या शाळा नं.20 व 34 या उर्दु शाळांच्या आवारात दरवर्षी पावसामुळे तलाव साचतात. विद्यार्थ्याना शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्ताच मिळत नसल्याने पाणी ओसरेपर्यंत शाळांना सुट्टी देण्याशिवाय पर्याय नसतो. रात्रीच्या पावसामुळे पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाल्याने आज संतप्त शिक्षक व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना घेवून महापालिका गाठली. आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत येथेच शाळा भरविली. यासोबतच बाफना हायस्कुल, साक्री रोडवरील स्वामी टेऊराम हायस्कूल, देवपूरातील महाजन हायस्कुल, माध्यमिक हायस्कुल या शाळांच्या आवारातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.

रस्ते उखडले, बस अडकली

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील विशेषतः देवपूर परिसरातील रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. काहीठिकाणी काम झाले असले तरी अद्याप बर्‍याचशा भागात काम अपूर्ण आहे. वाडीभोकर रस्त्याची हिच परिस्थिती असल्याने अभियंता नगरजवळ खड्ड्यांमुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात महामंडळाची बस काही काळ अडकली. इतर रस्त्यांची अवस्था देखील अशी असून कालच्या पावसामुळे पुन्हा अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहे.

जवळ नाल्याला पूर आल्याने फरीशी उखडली. तर हाच नाला पुढे नेहरु नगर व देवपूर बसस्थानकाच्या मागीलबाजूने वाहत जातो. याठिकाणी देखील छोट्या पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून नाल्याच्या पुराचे पाणी नजीकच्या घरांमध्ये शिरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com