
धुळे । प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गाव शिवारातील गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी काल संयुक्तपणे छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत एकुण 7 लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकावर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तुर, हरभरा व कापुस पिकांच्या आड गांजाची लागवड केली गेली होती.
रवि कालुसिंग पाडवी (रा.लाकडया हनुमान ता.शिरपुर) याने तो कसत असलेल्या लाकडया हनुमान गावाचे शेत शिवारातील शेतामध्ये प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केलेली असल्याची गुप्त माहिती काल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी पोसई बाळासाहेब सुर्यवंशी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने शिरपुर तालुका पोलिसांच्या मदतीने लाकडया हनुमान गावातील शेत शिवारातील शेतात रवि कालुसिंग पाडवी हा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला. शेतात जावुन पाहिले असता शेतात तुर, हरभरा व कापुस या पिकात मध्यभागी गांजा सदृश्य अंमली पदार्थाची हिरव्या रंगाची 3 ते 5 फुट उंचीचे एकुण 285 झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले. 7 लाख 8 हजार 60 रूपये किंमतीची एकुण 236 किलो 20 ग्रॅम वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी पोकॉ महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून रवि कालुसिंग पाडवी (रा. लाकडया हनुमान ता. शिरपुर) यांच्या विरुध्द शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनो व्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाची कारवाई
हिी कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शााखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई संदीप पाटील, पोहेकॉ संदीप सरग, सुरेश भालेराव, महेंद्र सपकाळ, जगदीश सुर्यवंशी, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकुर, कैलास महाजन तसेच शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोना संदीप ठाकरे, पोकाँ योगेश मोरे, संजय भोई, कृष्णा पावरा, रोहीदास पावरा, इसरार फारुखी, संतोष पाटील यांच्या पथकाने केली आहे.