
धुळे - प्रतिनिधी dhule
राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल गुटखा (Vimal Gutkha) व पानमसाल्याची (Panmasala) ट्रॅव्हल्स (Travels) मधून तस्करी करणाऱ्या टोळीला येथील चाळीसगाव (chalisgaon) रोड पोलिसांनी (police) ताब्यात घेतले. 15 लाखांची ट्रॅव्हल्स व दोन लाखांचा पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे या तस्करीत अल्पवयीन मुलाचा ही समावेश आहे. त्यानेच खुद्द हा माल माझ्या मालकीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी देखील हे अचंबित झाले आहेत.
ट्रॅव्हल्समधून (क्र.एम पी ३० पी २३१३) महाराष्ट्र (maharastra) राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत पानमसाला गुटख्या गुटखा हा इंदूरवरुन शिर्डी येथे उतरणार असल्याची खात्रीशीर माहिती शनिवारी रात्री चाळीसगांव रोड पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पथकाने चाळीसगाव चौफुलीवर सापळा रचला. पहाटे तीन वाजता इंदूरकडुन पुण्याकडे जाणारी संशयित ट्रॅव्हल्स दिसताच तिला थांबविली. त्यावरील चालकास त्यांचे नांव विचारले असता त्याने गोपाल रामसिंग यादव (वय २६, रा विराट नगर इंदूर) असे सांगितले. तसेच सहचालक वासीब कुतुबुद्दल अन्सारी (वय ३२ रा.७३ बाबा इंदूर) व क्लिनर कमलेश दिलीप बागेल (वय ३५ रा. चंदन नगर, इंदूर, मध्यप्रदेश) असे सांगितले. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास ३० प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ट्रॅव्हल्सच्या मागची डिक्कीची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या ६ प्लास्टिकच्या गोणी दिसुन आल्या. या गोण्या कोणाच्या आहेत, असे विचारले असता प्रवाशांपैकी पैकी एक मुलगा खाली उतरला. त्यांस गाडीत ठेवलेल्या ६ गोण्यांचे मालकीबाबत विचारले असता त्याने त्याचेच मालकीचे असल्याचे सांगितले.
गोण्यांमधील मालाची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळुन आला. आर. एम. डी. पान मसाला, राजश्री पान मसाला, एम टोबॅको गोल्ड, राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, ब्लॅक लेबल 18 प्रिमीअम च्युईंग तंबाखुचे पॅकेटस, व्हीआ टोबॅको, तुलसी 00 तंबाखु, के पी ब्लॅक लेबल 18 तंबाखुचे असा एकूण 2 लाख 11 हजारांचा गुटखा व 15 लाखांची पवन टुर्सची ट्रॅव्हल्स असा एकूण 17 लाख 11 हजार 428 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुटख्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी समर्पक उत्तरे न दिल्याने विधी संघर्ष ग्रस्त बालकासह चौघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी चौघांनी विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८, २७२,२७३, १८८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (iv), कलम २७ (३) (d), कलम २७ (३) (e), कलम ३० (२) (a), कलम ३ (१) (झेडझेड ) (आय) व कलम (१) (झेडझेड ) (व्ही) शिक्षा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोरकुमार काळे, सहा.पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोउपनि विनोद पवार, पोहवा पंकज चव्हाण, संदीप पाटील, पोना भुरा पाटील, विशाल मोहने, पोकॉ वैराट, स्वप्निल सोनवणे, हेमंत पवार, चेतन झोळेकर, सोमनाथ चौरे व विशाल गायकवाड यांनी केली आहे.