हिरे वैद्यकीय महाविद्यालयात बसविणार ऑक्सीजन टँक

पालकमंत्र्यांनी दिली मान्यता
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात बसविणार ऑक्सीजन टँक

धुळे- प्रतिनिधी- Dhule

शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन टँक बसविण्यास पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी मान्यता दिली आहे.

त्यांची प्रक्रीयाही सुरू झाली आहे. यामुळे टँकव्दारे 400 सिलेंडर्सचे काम होईल. तर वेळेसह पैशांची बसचत होणार असून मनुष्यबळाचे श्रम वाचणार आहे.

जिल्हयात हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय हे एकमेव कोव्हीड हॉस्पिटल आहे. येथे संपुर्ण धुळे जिल्हयातून तसेच शेजारच्या नंदुरबार, नाशिक जिल्हयाच्या मालेगाव सटाणा, जळगाव जिल्हयातून चाळीसगाव, पारोळा, अमळनेर येथून मोठया प्रमाणावर रुग्ण कोव्हीड-19 आणि नॉन कोव्हीड आजारांवर औषधोपचारासाठी येत असतात. कोव्हीड-19 ची गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेले रूग्ण तातडीच्या औषधोपचारासाठी दाखले केले जातात. या रुग्णांना ऑक्सीजनची गरज असते.

या रूग्णालयात उपलब्ध असलेल्या जॅम्बो ऑक्सिजन सिलेंडरर्समार्फत या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. परंतू राज्याच्या आरोग्य सेवा विभााचे संचालकांच्या निर्देशानुसार जेथे कोव्हीड-9 आजाराचे रूग्ण जास्त प्रमाणात व अधिक गंभीर रूग्ण दाखल होत असतात तेथे ऑक्सीजन टँक बसविणे गरजेचे असते.

ऑक्सीजन टँक बसविल्याने रूग्णालयातील कर्मचार्‍यांचे श्रम वाचतात. जम्बो ऑक्सीजन सिलेंडरर्सचा वापर करीत असतांना रूग्णालयातून दररोज किमान 50 कर्मचारी फक्त ऑक्सिजन सिलेंडरर्सच्या कामकाजासाठी उपलब्ध करून द्यावे लागतात. हे काम देखील श्रमाचे आहे.

ऑक्सिजन टँक बसविल्यास याची गरज भासत नाही. एक ऑक्सिजन टँक बसविल्यास त्याव्दारेे 400 सिलेंडर्सचे काम होईल आणि त्यामुळे शासनाच्या पैशांची देखील बचत होईल. असे ऑक्सिजन टँक महाराष्ट्रात यापुर्वी जे.जे. रुग्णालय, मुंबई, मिरज, पुणे येथभल बी.जे. रुग्णालय तसेच कोव्हीड-19 या परीस्थितीत सोलापुर, बेलापुर येथे ही बसविण्यात आलेे आहेत.

याची दखल घेऊन जिल्हयाचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी संजय यादव व हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी या विषयी चर्चा करून जिल्हयातील गरीब रुग्णांसाठी कोव्हीड करीता याची मदत होईल का? अशी विचारणा केली. वरील मुद्दे विचारात घेऊन त्यांनी त्यांनी यासाठी त्वरीत मान्यता दिली.

त्यानुसार हिरे महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन टँक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरीता आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. मुकरम खान, डॉ.राजेश सुभेदार, डॉ. निर्मलकुमार रवंदळे, अधिसेविका अरूणा भराडे हे प्रयत्नशिल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com