कंटेनर-मोटार सायकल अपघातात एक ठार

वाघाडी फाट्यावरील घटना, संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको
कंटेनर-मोटार सायकल अपघातात एक ठार

सोनगीर । दि.20 । वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर गावानजीक वाघाडी फाट्यावर कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दरम्यान वाघाडी फाट्यावर नेहमी अपघात होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दोन दिवसात गतिरोधक बसविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भडगाव वर्धाने ता. साक्री येथील अण्णा सुकदेव सोनवणे व देवीदास सुकदेव सोनवणे हे दोन्ही भाऊ मेंढा घेऊन वालखेडा ता.शिंदखेडा येथे मोटारसायकलने (क्र. एमएच 15 सीए 3750) जात असतांना सोनगीरकडून वाघाडीकडे महामार्ग ओलांडताना शिरपूरहून धुळ्याकडे वेगाने जाणार्‍या कंटेनरने (क्र. जीजे 03, बी डबल्यू 9881) मोटारसायकलीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की कंटेनरखाली मोटारसायकल अडकून सुमारे एक किलोमीटर अंतर ओढत नेले. अपघातात अण्णा भील जागीच ठार झाला तर देवीदास भील हा गंभीर जखमी झाला आहे. मेंढाही अपघातात मृत्यूमुखी पडला.

मयताच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य होते. मयताला येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. जखमीला धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अपघात झाला त्या जागेवर उड्डाणपूल नाही, सर्व्हीस रोड नाही. त्यामुळे वाहनांना अमळनेरकडून येणार्‍या किंवा सोनगीरहून अमळनेर जाणार्‍या वाहनांना महामार्ग ओलांडावा लागतो. महामार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढते. वारंवार अपघात होऊनही चौपदरीकरण करणार्‍या टोलप्लाझा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. परिणामी दोन्ही ट्रकवर एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी बोलून दोन दिवसात गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. कंटेनर चालक संजय लालजी यादव (वय 27, रा. मांडवा, जिल्हा जौनपुर उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com