धावडे येथे मारहाण करत एकाचा खून

आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आणला मृतदेह
धावडे येथे मारहाण करत एकाचा खून

दोंडाईचा - Dondaicha - वि.प्र./श.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथे जुन्या वादातून एकास बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट दोंडाईचा पोलिस ठाण्यात आणत आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली.

त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ चौघांना अटक करत पाच जणाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

धावडे (ता. शिंदखेडा) येथील नारायणसिंग लोटनसिंग गिरासे (वय 52) यांना गावातील जितेंद्र दौलतसिंग गिरासे, महेंद्र दौलतसिंग गिरासे, इंद्रसिंग चिंधेसिंग गिरासे, जयपाल इंद्रसिंग गिरासे व सरलाबाई दौलतसिंग गिरासे यांनी खळ्यात जावून जुन्या वादाच्या कारणावरून व गायीला बॉल मारल्याचे निमित्त करून लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

काल दि. 26 रोजी दुपारी ही घटना घडली. त्यांचा आज सकाळी धुळे येथे खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी चार वाजता काढण्याचे ठरले होते.

मात्र पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास नातलगांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी मृतदेह थेट दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. नारायणसिंग यांची मुलगी पुनम गिरासे व मुलगाने एकच आक्रोश करत हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण अतिशय गंभीर व भावूक झाले होते.

शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, प्रभारी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक अनिल कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देवीदास पाटील यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्या आधीच पोलिसांनी चार संशीयत आरोपींना अटक केली होती. त्यामुळे नातेवाईकांचा काहीसा राग कमी करण्यास पोलीस प्रशासनाला यश आले.

सायंकाळी अंत्यसंस्कार-पोलिसांनी समजुत काढल्यानंतर नातेवाईकांनी नारायणसिंग गिरासे यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा दोंडाईचाचे प्रभारी पंकज कुमावत, शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक अनिल कोंकरे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील उपस्थित होते. यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com