तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महापालिकेने प्रस्ताव द्या

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश
तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महापालिकेने प्रस्ताव द्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रार निवारण जिल्हास्तरावर गठित समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यातील तृतीयपंथींयांना मानवतेच्या भावनेतून शासकीय योजनांचे लाभ मिळवून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत प्रयत्न करावेत. त्यासाठी तृतीयपंथीयांनीही तातडीने समाजकल्याण विभागाकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. यादव म्हणाले, की सन्मानाने जगणे हा तृतीयपंथीयांचा हक्क आहे. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. नोंदणी करतांनाच त्यांच्या समस्या, अडचणींची माहिती करून घ्यावी. अशा व्यक्तींना पात्रतेनुसार स्वस्त धान्य, घरकूल योजनेचे लाभ मिळवून द्यावेत. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी संबंधितांकडे पाठपुरावा करावा.

या घटकांची माहिती मिळविण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेळोवेळी समुपदेशन करावे. त्यांना कौशल्य प्रशिक्षण, लहानमोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होवू शकेल. त्यासाठी कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत सादर करावा.

तृतीयपंथीयांना आरोग्याच्या सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून द्याव्यात. त्याबरोबरच तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत मीना भोसले, शांताराम अहिरे, सचिन शेवतकर आदींनी भाग घेत विविध सूचना केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com