ग्रामीण रुग्णालयात महिला व जुळ्या मुलांना जीवदान

गंभीर व गुंतागुंतीची डिलिवरी केली नॉर्मल
ग्रामीण रुग्णालयात महिला व जुळ्या मुलांना जीवदान

सोनगीर (वार्ताहर) - Songir

येथील ग्रामीण रुग्णालयात अतिशय गंभीर व गुंतागुंतीची डिलिवरी नॉर्मल करून एक महिला व तिच्या जुळ्या मुलांना जीवदान देण्याचे काम डॉ. प्रफुल्ल फुलपगारे व त्यांचा सहकाऱ्यांनी केले.

सारंगखेडा ता. नंदूरबार परिसरातील काही आदिवासी मजूर कुटुंबे बारामतीला ऊसतोडणी कामास ट्रकने जात होते. त्यातील बानुबाई रवींद्र काकडे ही आदिवासी गर्भवती महिलेची प्रसृतीची वेळ जवळ आल्याने तिला भयंकर वेदना होत होत्या. सोनगीरला पोहचताच ट्रक चालकाने सरळ ग्रामीण रुग्णालय गाठले. काल शुक्रवारी (ता. 25) रात्री एकच्या सुमारास तिला ग्रामीण रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. डॉ. प्रफुल्ल फुलपगारे, परिचारिका शीतल मालवणकर त्यांचा सहकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले.

महिलेची अवस्था काहीशी चिंताजनक असताना डॉ. प्रफुल्ल फुलपगारे व परिचारिकांनी प्रयत्न सुरूच ठेवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पाटील यांचे मोबाईलवर मार्गदर्शन सुरूच होते. महिलेने एका मुलाला व दहा मिनिटांनी दुसऱ्याला अशा जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष म्हणजे दोन्ही मुलांचा पायाकडील भागाने व ते ही नॉर्मल जन्म झाल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी जगन्नाथ कर्वे, सिध्दार्थ शिंदे, कैलास ठाकूर, नाना खैरनार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com