विधान परिषद निवडणूक : तयारी सुरु

विधान परिषद निवडणूक : तयारी सुरु

धुळे । प्रतिनिधी Dhule

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक दि. 1 डिसेंबर रोजी होत असून प्रशासनाकडून निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठीही प्रशासनाने तयारी केली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होत असून त्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोना महामारी काळात ही निवडणूक होत असल्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. तसेच मतदार केंद्रांवर वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक खुल्या व मुक्त, निर्भय वातावरणात पार पारडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या तारखेच्या 48 तास आधी कोरडे दिवस व मतमोजणी दिवशी कोरडे दिवस जाहिर करण्यात आले आहेत. त्यामुळे दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर, दि. 30 नोव्हेंबर रोजी संपुर्ण दिवस, दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील देशी, विदेशी दारुचे दुकाने बंद राहणार आहेत.

काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य अमरिशभाई पटेल यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक होत आहे. यासाठी श्री. पटेल यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील अभिजित मोतीराम पाटील यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केला आहे. यापुर्वी दाखल केलेले अर्ज ग्राह्य धरुन ही निवडून होत आहे. सरळ लढत होत असून बदलेल्या राजकीय समीकरणामुळे याकडे लक्ष लागून आहे.

मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक

निवडणूकीसाठी जिल्ह्यात चार तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तेथे आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आता उमेदवारांचा भेटीगाठीवर भर

विधान परिषद पोट निवडणूकीच्या प्रचाराची मुदत दि. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी संपली. त्यामुळे आता गुप्त प्रचारावर आणि भेटीगाठीवर उमेदवार भर देतील. दि. 1 डिसेंबर रोजी निवडणूक होईल. तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

पसंतीक्रमाच्या मतमोजणीची पध्दत वेगळी

पसंतीक्रमाच्या मतमोजणीची पध्दत वेगळी असून त्यात एकूण झालेल्या मतदानातून अवैध मते बाजूला करुन वैध मत भागिले दोन अधिक एक असा कोटा निश्चित केला जातो. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस एकाही उमेदवाराने मताचा कोटा पुर्ण न केल्यास मग दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यानुसार पहिल्या व दुसर्‍या पसंतीच्या मतांची विभागणी करुन जो उमेदवार मतांचा कोटा पुर्ण करतो त्याला विजयी जाहिर करण्यात येते.

-प्रमोद भामरे,

उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात दहा केंद्रांवर मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. मतदान केंद्रांवर त्या- त्या तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात मतदान केंद्र राहतील. त्यात तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, तहसील कार्यालय, साक्री, तहसील कार्यालय, शिंदखेडा, तहसील कार्यालय, शिरपूर (नवीन इमारत) जि. धुळे, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, तहसील कार्यालय, नवापूर, तहसील कार्यालय, शहादा, तहसील कार्यालय, अक्राणी, तहसील कार्यालय, तळोदा, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ज्या तालुक्यातील संबंधित मतदार विजयी झाले असतील त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर संबंधित मतदारांनी मतदान करावयाचे आहे.

- संजय यादव, जिल्हाधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com