कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आढावा बैठकीत निर्देश
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूबाधित (Corona virus) रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने (Department of Health) कोरोना विषाणूबाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करीत चाचण्यांची संख्या (Number of tests) वाढवावी. दररोज किमान तीन हजार चाचण्या कराव्यात. लसीकरण मोहिमेला गती देतानाच कोरोनाबाधित रुग्णांवरील औषधोपचारासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी दिले.

कोरोना विषाणूविषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, डॉ. संतोष नवले, डॉ. निर्मल रवंदळे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), सुरेखा चव्हाण, डॉ. श्रीकुमार चिंचकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाने सतर्क राहावे. आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावेत. व्हेन्टिलेटरची तपासणी करून ते सुध्दा कार्यान्वित करावेत. ऑक्सिजन प्रकल्प तातडीने पूर्ण करून त्यांची चाचणी करावी. तसेच पुरेसा ऑक्सिजन साठा राहील याचेही नियोजन करावे.

रुग्ण संख्या वाढत असतानाही नागरिक विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्यावर पोलिस दलाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने दंडात्मक कारवाई सुरू करावी. तसेच विना मास्क फिरणार्‍या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. याबरोबरच कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती द्यावी. आरोग्य कर्मचार्‍यांनी बुस्टर डोस घ्यावा. त्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

धुळ्यात 80 टक्के लाभार्थ्यांचाच पहिला डोस

धुळे शहरातील 80 टक्के लाभार्थ्यांनीच पहिला डोस घेतला आहे. इतर नागरिकांनी अद्यापपर्यंत एकही डोस घेतलेला नाही. दि. 26 जानेवारीपर्यंतच कोविडशिल्ड लसीकरणाचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप कोविड लसीकरणाचा एकही डोस घेतला नसेल त्यांनी महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या नागरिकांचा कोविडशिल्डचा दुसरा डोस घ्यावयाचा बाकी असेल त्यांनाही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरीक व 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा शासनाकडून प्राप्त झाल्यावर लसीकरण सुरु करण्यात येईल.

-देविदास टेकाळे, आयुक्त महापालिका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com