
धुळे Dhule। प्रतिनिधी
शहरासह परिसरात आजही पावसाने Heavy rain जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने weather department वर्तविलेला अंदाज सार्थ ठरवित पावसाने यावेळी मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.
आधीच दोन दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. त्यातच सकाळी आणि सायंकाळी पावसाने आपले खरे रुप दाखवित सार्यांना हादरवून सोडले ढगांच्या गडगडाटांसह विजेच्या कडकडाटांनी कानठिळ्या बसविल्या. सकाळी अर्धातास तर सायंकाळी किमान पाऊण तास पाऊस झाला. यामुळे शहरातील मोतीनाला, हागर्या नाला, रंगनाला, सुशिनाला, लेंडीनाला, अन्वर नाला यांना पावसामुळे पूर आल्याने काठावर राहणार्या काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
त्याच प्रमाणे मिल परिसरात श्रीराम कॉलनी, साईदर्शन कॉलनी, हाड्डी कारखाना परिसर, योगेश्वर कॉलनी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. याशिवाय श्रीराम पेट्रोल पंप ते बारापत्थरपर्यंत रस्ता पुर्णपणे पाण्याखाली गेला. देवपूरात तर अनेक भागांमध्ये खड्डे व चिखलांमुळे पायी चालणेही मुश्कील बनले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने गणेश मूर्ती विक्रेत्यांचे देखील मोठी धांदल उडाली. अजून दोन दिवस पावसाचा जोर राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सगळीकडे पाणीच पाणी
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अर्धातास मुसळधार पाऊस झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा किमान पाऊण तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले तर घरांमध्येही पाणी शिरले. विशेषत: नाल्याकाठी असलेल्या घरांना पावसाचा फटका बसला. काहींचे संसार उघड्यावर आलेत. ग्रामीण भागातही या पावसामुळे घरांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.