
धुळे । dhule । प्रतिनिधी
येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या पथकाने शहरातील तीन जुगार अड्डयांवर (Gambling dens) छापा (raided) टाकत कारवाई केली. पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्यासह पथकाने शहरातील वलवाडी शिवारातील इंदिरा नगर, मध्यवर्ती बस स्थानकासमोरील वेलकम हॉटेलजवळ व पांझरा नदीकिनारी पांझरा कॉम्प्लेक्स येथे अवैधरित्या सुरू असलेल्या अंकसट्टयाच्या जुगार अड्डयांवर छापा टाकत कारवाई केली. इंदिरा नगरात एकाकडून जुगाराचे साहित्य, 4 हजारांचा मोबाईल व 4 हजार 400 रूपये रोख असा एकुण 8 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर मुख्य बस स्थानकासमोरील वेलकम हॉटेलवरून एक व पांझरा कॉम्प्लेक्समधून एकाला ताब्यात घेतले. तर दोन जण प्रसार झाले. दोघांकडून मोबाईल, जुगाराचे साहित्य असे एकुण 38 हजार 150 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिनही कारवाई मिळुन एकुण 48 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल तसेच एकुण 5 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत धुळे शहर व पश्चिम देवपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, सपोनि संगिता राऊत, पोसई पवार, पोहेकॉ कबीर शेख, चंद्रकांत जोशी, मंगा शेमले, जितेंद्र आखाडे, रमेश उघडे, भागवत पाटील, पोना नरेंद्र पवार, पोकॉ विवेक वाघमोडे, पोकॉ प्रशांत पाटील, कर्नल बापु चौरे यांनी केली आहे.