धुळ्यात अपघातात पिता-पुत्र ठार

आई व मुलगा जखमी, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा
धुळ्यात अपघातात पिता-पुत्र ठार

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील देवपूर परिसरातील एकविरा देवी मंदिराजवळील नदी किनारील रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरचे चाक अचानक निखळल्याने ट्रॅक्टर एका दुचाकीवर धडकली. त्यात पिता-पुत्र ठार झाले तर आई व मुलगा जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील पांझरा नदी किनारी असलेल्या शंभर फुटी रस्त्यावरुन काल सकाळी प्रभात नगरकडून वीर सावरकर पुतळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरचे (क्र. एमएच 19/सी-8656) पुढील चाक अचानक निखळले. यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते एकविरादेवी मंदिराच्या बाजूला व दशक्रिया विधी शेड शेजारी असलेल्या शुभम सुदाम मटकर यांच्या टपरीकडे वळाले. त्याचवेळी तेथून जाणार्‍या दुचाकीला (क्र.एमएच 46/एस-514) टॅक्टरने जोरदार धडक दिली.

त्यात दुचाकीवरील हेमंत भगवान बोडरे (वय 40) त्यांची पत्नी अनिता हेमंत बोडरे, मुलगा साई हेमंत बोडरे (वय9), मुलगा उत्कर्ष हेमंत बोरडे सर्व (रा. तिरुपती नगर, देवपूर, धुळे) हे चौघे जण टॅक्टरखाली येवून गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने देवपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

या रुग्णालयात उपचार घेत असताना हेमंत बोडरे व साई बोडरे या पिता-पुत्राचा मृत्यू झाला. तर अनिता बोडरे व उत्कर्ष बोडरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात दुचाकीचे ही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी शुभम सुदाम मटकर (रा. गल्ली नंबर 7, एकवीरादेवी मंदीरा मागे, देवपुर) यांच्या फिर्यादीवरुन देवपूर पोलिस ठाण्यात टॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे तिरुपतीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.