
धुळे dhule। प्रतिनिधी
साक्री तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकर्यावर (Farmer injured) मादी बिबट्याने हल्ला (leopard attack) केला. त्यातून शेतकरी बालंबाल बचावला असून त्याच्या चेहर्यावर आठ ते दहा टाके पडले आहेत. विशेष म्हणजे भर दुपारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.
मनोहर संभाजी क्षिरसागर (वय 32 रा. घोडदे) असे जखमी तरुण शेतकर्याने नाव आहे. तो दुपारी आपल्या शेतात फडतर कपाशी काढण्यासाठी गेला होता. शेतातून कपाशी वेचणी झाल्यानंतर शेजारी शंभर मीटर अंतरावर दुसर्या शेतात कपाशी वेचणी करण्यासाठी मजूराला सोडले. त्यानंतर पुन्हा पहिल्या शेतात आल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची आऊटलेट (बेड) बंद करत असताना दुपारी 12.45 च्या सुमारास मादी बिबट्या व तिचे पिल्लू आले. मादी बिबट्याने अचानक मनोहर क्षिरसागर याच्यावर हल्ला चढविला.
या हल्लयात शेतकर्याच्या चेहर्यावर जखमा केल्या. तेव्हा आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकरी, मजुर धावून आले. त्यामुळे मादी बिबट्या व तिचे पिल्लू पळुन गेले. या हल्ल्यात शेतकरी क्षिरसागर 8 ते 10 टाके पडले. भर दिवसा ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान सध्या शेतकर्यांना कांदा, गहू, हरबरे, मका, ऊस व भाजीपाला पिकांना पाणी भरण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यातच आता दिवसाही बिबट्यांचा वावर आढळून लागल्याने शेतकर्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने घटनेची गांभीर्याने दखल घेत सापळा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. जखमी तरुण शेतकरी हा घोडदे येथील प्रगतशील शेतकरी व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिंगबर पाटील यांचा पुतण्या आहे.