कोरोना लस न घेता बनावट प्रमाणपत्र विक्रीचा घोटाळा

पाचशेच्या नकली नोटांच्या माळा घालून शिवसेनेची निदर्शने, निलंबनाची कारवाई करत गुन्हे नोंदवा
कोरोना लस न घेता बनावट प्रमाणपत्र विक्रीचा घोटाळा

धुळे ।Dhule प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Municipal Health Department) कोरोना लस न घेता पैसे घेवून बनावट प्रमाणपत्र (Fake certificate) देण्याचा घोटाळा केला असून सुमारे दोन कोटींचा हा घोटाळा आहे. यात सुमारे 50 हजार कोरोना लसी (Corona vaccine) काळ्याबाजारात विकल्याचा (sold on the black market) संशय आणि आरोपही शिवसेनेने केला आहे. या प्रकाराची चौकशी करून निलंबीत करत संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे.

यावेळी 500 च्या नकली नोटांच्या माळा घालून सेनेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन केले. बनावट प्रमाण पत्रांच्या धिक्काराचे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी निवेदन देण्यासाठी जाणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी गेटवर अडविले. यावेळी आंदोलकांनी प्रशासन व सत्ताधार्‍यांच्या विरोधात गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले. पोलिसांच्या विनंतीने प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपायुक्तांना निवेदन दिले.

यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, किरण जोंधळे, महेश मिस्तरी, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतिष महाले, डॉ.सुशील महाजन, राजेश पटवारी, धिरज पाटील, गुलाब माळी, संजय वाल्हे, नरेंद्र अहिरे, संदीप सुर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, संदीप चव्हाण, छोटू माळी, मच्छिंद्र निकम, प्रकाश शिंदे, प्रविण साळवे, विनोद जगताप, दिनेश पाटील, पुरूषोत्तम जाधव, डिगंबर चौधरी, हेमलता हेमाडे, प्रतिभा सोनवणे, डॉ.जयश्री वानखेडे, संगिता जोशी, अरूणा मोरे, सुनिता वाघ, अरूणा पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, धुळे मनपा आरोग्य विभागाने लस न घेता 400/500 रुपये घेऊन जवळपास आठ ते दहा हजार लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून हा प्रकार म्हणजे मेलेल्याच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्यशासनाने व केंद्र शासनाने काही निबंध घातले आहेत. त्यात कोठेही जाण्या-येण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक केलेले असून यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला आहे या शासकीय आदेशांची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची अथवा त्या त्या विभागाची जबाबदारी आहे. परंतु आपल्या धुळे महापालिकेने या जबाबदारीचा गैरफायदा घेत नकली प्रमाणपत्र विकण्याचा धंदा केला आहे. एस.व्ही.के.एम. नावाच्या लसीकरण केंद्रावर एका दिवसात तब्बल 2400 प्रमाणपत्र देण्याचा विक्रम घोटाळे बाजांनी केला आहे. सुटीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असताना देखील मनपाच्या या महाभागांनी प्रमाणपत्र वाटपाचा पराक्रम केला असून लसीकरण केलेले नसताना प्रमाणपत्र दिल्यामुळे लसीकरण न करता नोंद झालेल्या लसीच्या बाटल्या काळ्याबाजारात विकल्याची शक्यता आहे. यातून जवळपास 2 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा वरिष्ठांच्या आदेशाने केल्याचे लेखी पत्र काही कर्मचार्‍यांनी दिले असून एका राजकिय नेत्याच्या दबावामुळे थातूरमातूर कारवाई करून यातील बड्या धेंडांना वाचविण्याचा प्रकार मनपात शिजतो आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून आयुक्त म्हणुन यावर कारवाई करणे हे आपले कर्तव्य असून कोणाच्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com