संजय बंबच्या पत्नीसह सुनेच्या लॉकरमध्येही मिळाले घबाड
धुळे । Dhule । प्रतिनिधी
अवैध सावकार राजेंद्र बंब याचा भाऊ संजय बंब अद्यापही फरार असून पोलिस पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान संजय बंबच्या पत्नीसह सुनेच्या श्रीराम पंतसंस्थेच्या लॉकरची आज तपासयंत्रणेेने झडती घेतली. त्यातही मोठे घबाड मिळून आले आहे. मोठ्या रोकडसह कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश, एफडी अशी कागदपत्रे जप्त करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
विमा एंजट तथा अवैध सावकार राजेंद्र बंब सध्या तिसर्या गुन्ह्यात आझादनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यांच्यावर जयेश दुसाणे यांच्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या गुन्ह्यात पहिल्याच दिवशी राजेंद्र बंबच्या घरासह दोन बँक व एका पतसंस्थेच्या लॉकरमधून आतापर्यंत 17 कोटी 74 लाख 76 हजार 369 रूपयांचा मुद्येमाल जप्त केेला आहे. तर त्याचा भाऊ संजय बंब याच्या घरातूनही गुन्हयाशी संबंधीत कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल जप्त करण्यात होता. तेव्हा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतू तो आला नाही. त्यानंतर मात्र तो फरार झाला.
आता त्याचा शोध सुरू आहे. दोन दिवसांपुर्वीच तपासयंत्रणेने संजय बंबचा मुलगा सौरभ बंबची चौकशी केली होती. त्यानंतर आज तपासयंत्रणेचे प्राप्त माहितीनुसार संजय बंब याची पत्नी व सुनेच्या श्रीराम पतसंस्थेतील लॉकरची तपासणी केली. त्यात मोठी रोकड मिळून आली आहे. याबरोबच एफडी, कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेशी देखील मिळून आले आहे. ते जप्त करण्यासह रोकड मोजदाजची रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, उपनिबंधक मनोज चौधरी, राजेंद्र विरकर यांच्यासह पथकाने केली.