कचरा संकलनाचे काम पुन्हा वॉटरग्रेसला

मनपा स्थायीत सभापती सुनिल बैसाणे यांची माहिती
कचरा संकलनाचे काम पुन्हा वॉटरग्रेसला

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील कचरा संकलनास रिलायबल एजन्सीने नकार दिला आहे. त्यामुळे वॉटरग्रेस कंपनीची मनधरणी प्रशासनाने करून सत्ताधार्‍यांच्या नाकावर टिचून प्रशासनाने या कंपनीकडून काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थायी समितीच्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुनिल बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला उपायुक्त शांताराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, अमोल मासुळे, कशीश उदासी, कमलेश देवरे, युवराज पाटील, संतोष खटाळ आदी उपस्थित होते.

रिलायबल कंपनीने कचरा संकलनाची जबाबदारी घेतली असतांना या कंपनीने अचानक काम करण्यास नकार का दिला? नेमके काय घडले? प्रशासन वॉटरग्रेस कंपनीला पाठीशी का घालत आहे? वॉटरग्रेस कंपनीचे किती बिल काढले? महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही का? अशा प्रश्नांची भडीमार अमोल मासुळे यांनी केला.

वॉटरग्रेस कंपनीकडून पुन्हा कामात कुचराई झाल्यास प्रशासन काय कारवाई करणार? कचरा संकलन होत नसल्याने घाण साचली आहे. असा प्रश्न युवराज पाटील यांनी उपस्थित केला.

वॉटरग्रेस या वादग्रस्त कंपनीने काम केले नसतांना त्यांची बिले प्रशासनाने काढली असतील तर संबंधित लेखा विभागाच्या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही. असा दमही सभापती बैसाणे यांनी भरला.

वॉटरग्रेस कंपनीला आपण कार्यमुक्त केलेले नाही. रिलायबल कंपनीने अचानक नकार दिल्याने आपल्याकडे पर्याय नाही. आपण निविदा प्रक्रिया राबवत असून येत्या 28 जानेवारीला निविदा उघडली जाईल. त्यातून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न राहिल. निविदा उघडल्यानंतर तसा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवला जाईल. फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत नवीन ठेकेदारामार्फत कचरा संकलनास सुरुवात केली जाईल, असे उपायुक्त गोसावी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com