संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे !

धुळ्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधला व्यापार्‍यांशी संवाद
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणूच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचे जगभरात संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यावसायिकांनी राज्य शासनाने दिलेल्या वेळेतच दुकाने बंद करीत सहकार्य करावे.

नागरिकांनीही नियमितपणे मास्क वापरावा. व्यावसायिकांनीही ग्राहकांना नियम पालन करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सुभाष कोटेचा, जयश्री शहा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, धुळे जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी दिसत असली, तरी अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. धुळे जिल्हा महामार्गांवरील जिल्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने व्यावसायिकांना दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसायास अनुमती दिली आहे. त्यानंतरही अनेक दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर आहे. शनिवार, रविवारी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनेटायझरचा नियमितपणे वापरासाठी प्रवृत्त करावे.

राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस यंत्रणेने कारवाई करावी. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी निर्धारित वेळेत आस्थापना बंद होतील, अशी दक्षता घ्यावी. त्यासाठी व्यापारी पेठेत नियमितपणे पाहणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापली पथके गठित करावीत. फेरीवाले, विक्रेते, व्यावसायिकांच्या कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. तसेच व्यावसायिक, विक्रेत्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या.

पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी सांगितले, राज्य शासनाने नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. विना मास्क आणि निर्धारित वेळेनंतरही रस्त्यांवर फिरणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. आयुक्त श्री. शेख यांनी सांगितले, ङ्गकोविड- 19फ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. निर्धारित वेळेत आस्थापना बंद होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. बंग यांनी सांगितले, राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांच्या अंमलबजावणीसाठी व्यापारी महासंघातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यासाठी पथकेही गठित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com