
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
शहरातील आझादनगर पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्ह्यांचा छडा लावला आहे. नाशिक कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने पाळधीतील एकाला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबूली दिसून असून त्यांच्याकडून दोन बुलेट दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
शहरातील हॉटेल शेरेपंजाब शेजारील अग्रवाल ट्रेडर्स येथे राहणारे अॅड. श्रेष्ठ शंकरलाल अग्रवाल (वय 26) यांच्या मालकीची 60 हजारांची बुलेट दुचाकी (क्र एमच18 एके 8696) दि. 17 मार्च रोजी चोरट्यांनी लंपास केली होती.
तर दि. 27 फेब्रुवारी रोजी पहाटे हॉटेल चालक आकाश प्रकाश साखला (वय 22 रा.आग्रा रोड, प्रभाकर टॉकीज समोर) यांचीही बुलेट दुचाकी (क्र.एमएच 18 एटी 1307) चोरीस गेली.
तिची किंमत 75 हजार रुपये होती. याप्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतांना आझादनगर पोलिस पवन उर्फ विक्की प्रेमचंद पाटील (वय 25 रा. 53,दिपाली पार्क, नवागाव, सुरत व मुळ रा.आव्हानी पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव) याच्यापर्यंत पोहोचले.
पंरतू तो नाशिक कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले.
चौकशीत पवन याने दोन्ही गुन्हयांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन्ही बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे तसेच आझादनगरचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोकॉ सागर सोनवणे, चेतन सोनवणे, नितीन शिरसाठ, संतोष घुगे यांनी ही कामगिरी केली. तपास पोहेकॉ संजय सुर्यवंशी हे करीत आहेत.