
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
तालुक्यातील वार येथे पुर्ववैमनस्यातून चुलत नातूनेच कोयत्याने वार करत आजोबांची निर्घुन हत्या केली.
आज भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी नातू विरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
आत्माराम हिरामण पारधी (वय 68 रा. वार ता. धुळे) असे मयत आजोबांचे नाव आहे. ते पत्नी, चार मुले, सुना यांच्यासह गावात राहतात. त्यांच्या घराजवळ त्याचा चुलत नातू ज्ञानेश्वर पारधी हा राहतो.
तसेच शेजारीच ज्ञानेश्वरच्या आजीचे घर आहे. आज सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर हा आजीकडे आला. तेव्हा त्याने जुना वाद उकरून आत्माराम यांच्याशी वाद घातला.
त्यातून त्याने थेट आत्माराम यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केले. त्यामुळे ते जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्लानंतर ज्ञानेश्वर हा पसार झाला. घटनेमुळे गाव सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
प्रसंगी फॉरेन्सीक टिमलाही पाचारण करण्यात आले होते. यावेळी संरपंच दिलीप गिरासे, उपसरपंच निंबा अहिरे, पोेलिस पाटील किशोर वाघ हे उपस्थित होते.
घटनेमुळे पारधी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान पोलिसांनी ज्ञानेश्वर पारधी याचा शोध सुरू केला आहे.