बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

हिवरखेडा शिवारात सांगवी पोलिसांची कारवाई; चौघांना अटक; 19 लाखांचा मुद्येमाल जप्त
बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील हिवरखेडा गाव शिवारात छापा टाकत सांगवी पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना उध्द्वस्त केला. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळाहून स्पिरीटसह 19 लाख 26 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चौघांवर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या कारखान्यात बॉम्बे व गोवा व्हिस्की नावाने बनावट दारू तयार केली जात होती.

हिवरखेडा गाव शिवारातील एका शेतातील घरात एक इसम बनावट दारू तयार करण्याचे साहित्य बाळगून लोकांच्या आरोग्यास अपायकारक अशी बनावट दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बनवित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाने काल दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला.

तेथे बनावट दारू तयार करतांना राजेश गिलदार बर्डे (रा. नेवाली जि, बडवाणी), धर्मेद्र कैलासचंद पुरभिया (रा. ढुढलाय ता. जुलालपुर जि. शाजापूर), देवेंद्र मोतीला मालवी (रा. बेरागढ खुमान ता. शामपूर जि, सिहीर) व योगेश बाबुलाल मालवी (रा. जिकडाखेडा ता. बागली जि. देवास, मध्यप्रदेश) या चौघांना ताब्यात घेतले.

घटनास्थळाळून दोन लाख रूपये किंमतीचे एकुण 2 हजार लिटर स्पिरीट, 3 लाखांच्या 30 हजार प्लॉस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, 30 प्लॉस्टिक पिशव्या भरलेल्या, 3 लाख 50 हजारांचे सात प्लॉस्टीकच्या पिशवीत भरलेले दहा हजार बुच, 2 लाखांचे बॉटलला बुच लावण्याचे मशीन, 1 लाखाचे बॉम्बे व्हिस्कीचे लेबल, 1 लाखाचे गोवा व्हिस्कीचे लेबल, 5 लाखांचे 2 होलाग्राम बंडल, 1 लाख 16 हजार रूपये किंमतीचे 137 लिटर चॉकलेटी व सुगंधीत रसायन, 40 हजारांचे तीन पाण्याच्या टाक्या, 15 हजारांचे पुठ्यांचे 30 बंडल व 5 हजारांची इलेक्ट्रीक मोटार असा एकुण 19 लाख 26 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

चौघे मानवी आरोग्यास अपायकारक व नशाकारक होईल, अशी बनावट दारू तयार करून ती बॉम्बे व्हिस्की व गोवा व्हिस्की कंपनीची आहे, असे भासविण्यासाठी सदर कंपनीचे बनावट लेबल व बुच बाटलीस वापरून बनावटीकरण करून लोकांची फसवणूक व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई नरेंद्र खैरनार, असई महेंद्र वानखेडे, नियाज शेख, पोहेका हेंमत पाटील, राजेंद्र मांडगे, धनगर, संजीव जाधव,पवन गवळी, पोना कुंदन पवार, पोकाँ इसरार फारुकी, सुनिता पवार व अश्विनी चौधरी यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com