सांगितली मिरची, निघाला 15 लाखांचा गुटखा

निजामपूरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; उडवाउडवीचे उत्तरे देणारा इसम ताब्यात
सांगितली मिरची, निघाला 15 लाखांचा गुटखा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील निजामपूर गावात स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाने एका पिकअप वाहनाला पकडले. वाहन मालकाला गाडीतील मालाबाबत विचारले असता त्याने मिरची असल्याचे सांगितले. मात्र तपासणी केली असता त्यात सुमारे 15 लाखांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी एकावर ताब्यात घेण्यात आले आहे.

निजामपूर गावातील आदर्श विद्या मंदिरासमोरील वासखेडी रोडवर एक संशयीत पिकअप वाहन उभे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पथक रवाना केले.

पथकाला वासखेडी रस्त्यावर या एम.एच.18बी.जी.0495 क्रमांकाचे पिकअप वाहन उभे दिसले. वाहनाजवळ एक इसम उभा होता. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रशांत जगन्नाथ बदामे (वय 26 रा.क्वालिटी प्रोव्हिजन शेजारी, निजामपूर) असे सांगितले.

वाहनांच्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला मिरची असल्याचे सांगितले.त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची तपासणी केली असता त्यात 13 लाख 61 हजार 360 रुपये किंमतीचा विमल सुगंधी पानमसाला, 2 लाख 40 हजार 240 रुपये किंमतीचा विमल व्ही-1 तंबाखू पाऊच आढळून आली.

पोलिसांनी चार लाखांचे वाहन व 15 लाख 40 हजार 240 रूपये किंमतीचा गुटखा असा एकुण 20 लाख 1 हजार 600 रुपये किंंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक योगेश राऊत, सुशांत वळवी, पोहेकॉ.संजय पाटील, संदीप थोरात, प्रकाश सोनार, पोना संतोष हिरे, संदीप सरग, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी केली. जप्त मुद्येमाल अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com