शेवाळी शिवारातील शेतातील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

81 हजारांची देशी दारूसह एक लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
शेवाळी शिवारातील शेतातील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावाच्या शिवारात (Shewali Shivara) असलेल्या शेतातील बनावट दारूचा कारखाना (fake liquor factory) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने उद्ध्वस्त (Destroyed) करून त्या ठिकाणावरून 80 हजार 640 रूपये किंमतीची देशी दारू (Indigenous liquor) व इतर साहित्य असा एक लाख 36 हजार 660 रूपयाचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) केला. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावाच्या शिवारात असलेल्या शेतात पवन सुदाम कोळी हा त्याच्या साथीदारासह दारू बनविण्याचा कारखाना चालवित असल्याबाबत माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा घातला असता पवन सुदाम कोळी (वय-19 वर्षे रा.शेवाळे, मेन गल्ली ता.शिंदखेडा) यास त्याच्या मालकीच्या शेतातील झोपडीत त्याचा साथीदार योगेंद्र किशोर सोनवणे (वय 24 वर्षे रा.प्लॉट नं.36 घुगे नगर, देवपुर धुळे) याच्यासह बनावट दारु तयार करीत असतांना रंगेहात पकडले.

त्यांच्या ताब्यातून 80 हजार 640 रुपये किंमतीच्या देशी दारु टँगो पंचच्या भरलेल्या एक हजार 344 बाटल्या, तीन हजार रुपये किंमतीच्या देशी दारु टँगो पंचच्या रिकाम्या एक हजार बाटल्या, 15 हजार रुपये किंमतीचे दारुच्या बाटल्यांचे बुच पॅकींगसाठी वापरले जाणारे लोखंडी कॅप सिलींग मशीन, दोन हजार 300 रूपये किंमतीचे पाच निळ्या रंगाचे 35 लिटर क्षमतेचे रिकामे प्लॅस्टिक ड्रम त्यात 15 लिटर क्षमतेचे रसायन, दोन हजार रुपये किंमतीचे पिवळ्या रंगाचे अल्कोहोल मिटर, दोन हजार सातशे रुपये किंमतीचे इतर साहित्य त्यात दारु बनविण्यासाठीचा सेंट, बुच, टाकी, ट्रे, गाळणी, नळ्या व टेक्सो टेप, 11 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 20 हजार रुपये किंमतीची एक विना क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण एक लाख 36 हजार 660 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पवन सुदाम कोळी व योगेंद्र किशोर सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पोकॉ किशोर पाटील यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून भादंवि 328,420 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ब) (क) (ड) (ई) (फ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेंद्र किशोर सोनवणे याच्या विरोधात यापुर्वी देवपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 87/2019 भादंवि 147,148,149 मु.पो.का.37(1)(3), राज्य उत्पादन शुल्क विभाग गु.र.नं. 151/2022 मु.पो.का.क 65 (अ) (ब) (क) (ड) (ई) (फ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनी प्रकाश पाटील,पोउनि बाळासाहेब सुर्यवंशी,पोउनी योगेश राऊत, असई धनंजय दीपचंद मोरे, पोहेकॉ संजय पाटील, प्रकाश सोनार, संतोष हिरे, पोना पंकज खैरमोडे, पोकॉ महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com