
दोंडाईचा श. प्र. - Dondaicha
नियमांचे उल्लंघन करून लग्न सोहळयात डिजे वाजवल्याने डिजे चालकास 27 हजाराची दंड देऊन कारवाई केल्याची घटना घडली. या घटनेमुळे डिजे चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. घरात बसावे तरी खाण्याची मारामार अन बाहेर डिजे काढला तर जमवलेली रक्कम देखील कारवाईत जात असल्याने जगावे की मरावे अशी स्थिती निर्माण झाल्याचे डिजे चालकांकडून बोलून दाखवले.
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लग्न सराई सह, सार्वजनिक समारंभावर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभाला कुठलाही बोबाटा न करता अवघ्या 2 तासाच्या आत 25 वराडीमध्ये लग्न उरकण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत.
मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत दोंडाईचा शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेले रामी गावात डि.जे लाऊन संचार बंदीचे उल्लंघन करण्यात येत होते. सदर घटना पोलिसांना कळताच त्यांनी डिजे चालकाला खडसावले व कडक सूचना दिल्या. विशेष म्हणजे आर.टी.ओ विभागाला डिजे वाहनांच्या बनावटीत त्रुटी आढळल्याने त्यांनी 27 हजार 200 रु दंड चालक संजय याच्या कडून वसूल केला आहे.
दरम्यान खाया पीया कूच नाही ग्लास तोडा बारा आणा अशी गत या डिजे चालकांची झाली होती. ही कारवाई दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गायकवाड, देविदास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील आदींनी केली आहे.