कानूमातेच्या उत्सवाला प्रारंभ

आज जल्लोषात होणार विसर्जन; रोटालाही सुरुवात
कानूमातेच्या उत्सवाला प्रारंभ

धुळे Dhule। प्रतिनिधी

खान्देश कुलस्वामीनी कानूमातेची (Khandesh Kulaswamini Kanumatechi) दि.7 ऑगस्ट रोजी पारंपारिक पध्दतीने स्थापना (Establishment) करण्यात आली. सोमवारी 8 ऑगस्ट रोजी जल्लोषात कानूमातेचे विसर्जन (immersion) करण्यात येणार आहे. दरम्यान रोटलाही 6 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कानूमातेच्या उत्सवावर निर्बंध होते. परंतू यंदा कोरोना महामारी कमी झाल्यामुळे जल्लोषात उत्सव साजरा करण्यात येत आहे.

श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी कानूमातेचा उत्सव खान्देशात साजरा केला जातो. या उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. यंदा दि.7 ऑगस्टला कानूमातेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे.

रविवारी सायंकाळी कानूमातेची स्थापना करण्यात आली. स्थापना करण्यापुर्वी सदर जागा स्वच्छ करून त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली व चौरंगावर कानूमातेची स्थापना करण्यात आली. काही ठिकाणी नारळाची तर काही ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली. आकर्षक फुलांनी देवीला सजविण्यात आले. रात्रभर कानूमातेसमोर जागरण करण्यात आले. यात लहान बालकांपासून अबालवृध्दांनी सहभाग घेतला. कानूमातेसमोर फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच कानूमातेचे गाणेही म्हणण्यात आले.

रविवारी रात्री जागरण केल्यानंतर सोमवारी पारंपारिक पध्दतीने कानूमातेचे नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी देखील मिरवणूकीत फुगड्या खेळल्या जातात. तर काही ठिकाणी डीजे लावून नृत्य सादर केले जाते.

कानूमातेच्या उत्सवात रोट करण्याची पारंपारिक पध्दत आहे. शनिवारी भाजी-भाकरीचे रोट करण्यात आले. तर रविवारी गोड रोट करण्यात आले. सोमवारपासून भाऊबंदकीच्या रोटाला सुरुवात होणार आहे. हे रोट पौर्णिमे अगोदर संपवावे लागतात. रविवारी कानूमातेला गोड रोटचा नैवेद्य दाखविण्यात आला.

जिल्ह्यात दि. 31 जुलै रोजी रविवारी देखील कानूमातेचा उत्सव साजरा करण्यात आला होता. तर आता दुसर्‍या टप्प्यात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा पांझरा नदी दुथडी वाहत असल्यामुळे कानूमातेचे विसर्जन पांझरा नदीत भाविक करणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com