
धुळे । dhule प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्थानकाच्या जागेत असलेल्या झोपड्यांचे अतिक्रमण (removal of encroachments) काढण्याची मोहिम आजपासून रेल्वे प्रशासनाने (railway station) हाती घेतली आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त घेतला असून तीन दिवसात नवले पथवे ते दसेरा मैदानपर्यंतच्या सुमारे 100 ते 125 कच्च्या झोपड्या काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे सहायक मंडळ अभियंता श्री.वाडेकर यांनी दिली.
याप्रसंगी रेल्वेचे चाळीसगांव येथील पीआय एस.के. सिंग, धुळे येथील पीएसआय आर.के. सिंग व त्यांचे 12 कर्मचारी, रेल्वे प्रशासनाचे 50 कर्मचारी, अभियंता डी.डी.ठाकूर तसेच धुळे पोलिस उपस्थित होते.
रेल्वे स्थानकाच्या जागेत मुख्य रस्त्यालगत 60 ते 70 कुटूंब सुमारे 20 वर्षापासून वास्तव्यास आहेत. परंतू ही जागा रेल्वे प्रशासनाची असल्याने प्रशासनाने त्यांना वेळोवेळी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमणधारक तेथेच राहत होते. त्यामुळे आज अखेर रेल्वे प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. रेल्वे प्रशासनाच्या 50 कर्मचार्यांकडून या झोपड्या हटविल्या जात आहेत.
या झोपड्यांमध्ये वीज जोडणीही होती. या कारवाईत नवले पथवेपासून ते दसेरा मैदानपर्यंत असलेल्या सुमारे 100 ते 125 झोपड्या हटविल्या जाणार आहेत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत हे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पुर्ण केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.