शासकीय विभागांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत !

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आढावा बैठकीत निर्देश
शासकीय विभागांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील शासकीय विभागांनी आपापसात समन्वय साधत आपल्याकडील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. महसूल वसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, प्रमोद भामरे, गोविंद दाणेज, डॉ. मधुमती सरदेसाई, सुरेखा चव्हाण, डॉ. श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, प्रलंबित कामांची माहिती करून घेत त्यातील तांत्रिक अडचणींची पूर्तता करून घ्यावी. गौण खनिजासह महसूल वसुलीवर भर द्यावा. गौण खनिज, वाळूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करावी. त्यासाठी भरारी पथकांसह संवेदनशील भागात तपासणी नाके, बैठी पथके कार्यान्वित करावीत.

सातबारा संगणकीकरणाच्या कामांना गती देत ई- फेरफार नोंदी तातडीने निकाली काढाव्यात. वनहक्काचे दावे निकाली काढण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिधापत्रिका आणि आधार क्रमांक संलग्न काम तातडीने पूर्ण करून घ्यावे.

तसेच गोदांमाना वेळोवेळी भेटी देवून पाहणी करावी. मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांचा आढावा घेत नियमितपणे तपासणी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी गौण खनिज वसुली, वनहक्क, सातबारा संगणकीकरण, पुनर्वसन, भूसंपादन, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थसाहाय्याच्या योजना, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतील विविध तरतुदींचा सविस्तर आढावा घेतला.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती बडे- मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ, उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील, श्रीमती चव्हाण, श्रीमती सरदेसाई, डॉ. चिंचकर, श्री. भामरे, श्री. दाणेज, भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक प्रशांत बिलोलीकर, तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी आपापल्या विभागाची माहिती सादर केली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com