बालविवाह निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत!

कार्यशाळेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
बालविवाह निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत!

धुळे Dhule। प्रतिनिधी

बालविवाह निर्मूलनासाठी (Abolition of child marriage) तयार केलेला कृती आराखडा (Action plan) अनुकरणीय आहे. धुळे जिल्ह्यातून बालविवाहाचे समूळ निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न (Collective effort) होणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत सहभागी होवून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी व कर्मचारी बालविवाह निर्मूलनासाठी निश्चितच प्रेरणादायी कार्य करतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी येथे केले.

महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल ण्ड बिव्हेविअर चेंज कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत अग्रभागी अधिकारी व कर्मचार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात सुरू झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी एस. व्ही. चव्हाण, यूनिसेफचे प्रतिनिधी निशितकुमार, पूजा यादव, मीनाकुमार यादव, किरण बिलोरे, नंदू जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, बाल वयात विवाह झाल्यास पुढे विविध समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे मुला- मुलींचा विवाह विहित केलेल्या वयातच करावा. बालवयात विवाह झाल्यास कुपोषित बालके जन्मास येण्याची शक्यता असते. त्यामुळे बालविवाह निर्मूलनासाठी राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. या प्रशिक्षण वर्गातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अधिकारी व कर्मचार्‍यांनी बालविवाहांच्या निर्मूलनासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. डोंगरे यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याची सविस्तर माहिती दिली. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले, बालविवाह ही अनिष्ट प्रथा आहे. बालविवाह निर्मूलनासाठी पोलिस दलातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. निशितकुमार यांनी केले. श्री. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बागूल यांनी आभार मानले. मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका अर्चना पाटील, श्रीमती एस. डी. परदेशी, बालकल्याण समितीचे सदस्य प्रा. सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, मंगला चौधरी, आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com