नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील मोघण शिवारात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा अखेर आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाकडून दुजोरा देण्यात आला. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृतांची संख्या तीन झाली असून वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

धुळे तालुक्यातील मोघण, बोरकुंड, होरपाडा, मांडळ परिसरात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात नंदाळे आणि बोरकुंड येथील दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर या बिबट्याने मोघण वनक्षेत्रातील एका शेतात रखवालदार असलेल्या रामसिंग पावरा यांचा 13 वर्षाचा मुलगा रमेश याच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात तो जबर जखमी झाला आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होता. अखेर त्याचा आज मृत्यू झाला.

बिबट्यामुळे शेत शिवार ओस पडू लागली आहेत. रात्रीच काय सकाळी अथवा दुपारी एकटा शेतकरी, ग्रामस्थ बालके, घराबाहेर पडण्यास शेतात जाण्यास धजावत नाहीत. सध्या कापुस वेचणीचा हंगाम असतानाही जीवाच्या भितीने शेतकरी, मजुरांनी घरी राहणेच पसंत केले आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोघण, होरपाडा, बोरकुंड परिसरात वनविभागाने सुमारे 15 पिंजरे लावले आहेत. तर पुण्याहून रेस्क्यू पथक दाखल होवून त्यांनी सापळा लावला आहे. ड्रोन कॅमेराचा वापर करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com