धुळ्यात बस-कंटनेरची धडक, चालक ठार

नऊ जण जखमी; चाळीसगाव चौफुलीवरील घटना
धुळ्यात बस-कंटनेरची धडक, चालक ठार

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील चाळीसगाव चौफुलीवर आज सकाळी एसटी बस (ST BUS) व कंटनेरची (Container) समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. त्यात बसचालक (bus driver) जागीच ठार (killed) झाला. तर सहचालकासह सुमारे 9 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठी गर्दी झाली. तसेच वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

विलास विनायकराव येवलेकर (वय 57 रा. प्लॉट 18, साने गुरुजी कॉलनी, मिल परिसर, धुळे) असे मयत चालकाचे नाव आहे. धुळे आगारातील एसटी बस (क्र.एमएच 14 बीटी 1790) ही काल दि.31 रोजी रात्री निमगुळ (ता. धुळे) गावी मुक्कामी होती. आज सकाळी साडेसहा वाजता ही बस प्रवाशांना घेऊन धुळ्याकडे येत होती. तेव्हा चाळीसगाव चौफुलीवर समोरुन येणार्‍या भरधाव कंटेनरने (क्र.आरजे 09/2571) बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालक विलास येवलेकर हे कॅबीनच्या बाहेर फेकले जाऊन रस्त्यावर आदळल्याने जागीच ठार झाले. तर त्यांच्या शेजारीच बसलेल्या सहचालकासह 8 ते 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी तातडीने हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांसह बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने या अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हलविण्यात आले. या अपघातात बस व कंटेनरच्या कॅबीनचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहनांचे काचा फुटून रस्त्यावर काचांचा खच पडला होता.

सेवानिवृत्ती पुर्वीच काळाची झडप- मयत बसचालक व्ही.व्ही. येवलेकर हे दोन ते तीन वर्षात सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा हसमूख व प्रेमळ स्वभाव होता. त्यांच्यावर आज काळाने घाला घातला. त्यामुळे येवलेकर कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

अपघाताला निमंत्रण, उड्डाणपुलाची मागणी-चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने ही चौफुली अपघाताला निमंत्रण देत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com