
धुळे - प्रतिनिधी dhule
साक्री तालुक्यातील (Sakri taluka) हट्टी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सख्या भावानेच तरूण बहिणीला गळफास देवून तिचा (Murder) खून केला. मात्र तिने गळफास घेतल्याचा बनाव केला.
एकाशी प्रेमसंबंध असल्याने बहिण पळुन जाण्याच्या बेतात असल्याच्या रागातून त्याने थेट हे टोकाचे पाऊल उचलले. (police) पोलिसांना आरोपी भावाला अटक केली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा रमेश हालोर (वय 22 रा. हट्टी) असे मयत तरूणीचे नाव आहे. तिचे सागर बागूल (रा.नवलाने) याच्याशी प्रेमसंबध होते. त्यातून ती पळून जाण्याचा बेतात होती. ही बाब तिचा भाऊ संदीप रमेश हालोर (वय 24) याला कळाली. त्या रागातून त्याने दि.13 जुन रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गाव शिवारातील शिवमेंढा येथे तिच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करत तिला गळफास लावून जिवे मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले.
एवढेच नाहीतर तिचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहीला. त्यानंतर घरी जावून पुष्पा हिने स्वतःच्या हाताने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे भासवून आई, मित्र तसेच ग्रामस्थांना खोटी माहिती दिली. तिचा अंत्यविधी करतेवेळी तिच्या अंगावरील सर्व कपडे, गळफास तयार केलेल्या साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने दहनात टाकून पुरावे नष्ट केले. अशी फिर्याद पोना संदीप ठाकुर यांनी निजामपूर पोलिसात दिली आहे.
त्यानुसार आरोपी संदीप रमेश हालोर याच्याविरोधात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पीएसआय दीपक वारे करीत आहेत.