
धुळे । Dhule प्रतिनिधी
सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील बोडकीखडी आणि कोंडाईबारी शिवारातील हॉटेल परिसरामध्ये महामार्गावरून जाणार्या टँकरमधून केमिकल (chemicals) व मालवाहू वाहनातून स्टिल, प्लॅस्टीक दाणे, खाद्य तेल व डिझेल सदृष्य द्रव्य काढून त्याचा काळाबाजार (Black market) करणार्यांवर नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने काल छापा टाकत कारवाई केली. त्यात पाच जणांना रंगेहात (5 arrested) पकडण्यात आले. तसेच 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 15 जणांवर साक्री पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
धुळे-सुरत महामार्गावरील बोडकीखडी शिवारातील हॉटेल सतलोजच्या पाठीमागे गोपाभाई नामक इसम व त्याचे साथीदार ट्रक चालकांशी संगनमत करुन स्टील, प्लास्टिक, खाद्य तेल, केमिकलचा काळाबाजार करत असल्यची गोपनिय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हॉएल सतलोजवर छापा टाकला. तेथे पाच जण टँकरमधून केमिकल काढून ते ड्रममध्ये भरताना मिळून आलेत. मात्र, पोलिसांना बघून दोघे जण पळण्यात यशस्वी झाले तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सभाजीत रामतीरथ यादव, रा. गोपालपूर, फैजाबाद (उ.प्र.), सध्या रा. सतलोज ढाबा, बोडकीखडी शिवार, ता. साक्रीे, रमेश लालता सोनखर, रा. चमराह, बनारस (उ.प्र.), सध्या रा. सतलोज ढाबा व एम. एच. 43 एक्स 8466 क्रमांकाच्या टँकरवरील चालक इम्रान शेख मोफिजुद्दीन शेख, रा. कालू जामपूर, साहेबरंज, झारखंड यांना ताब्यात घेतले. सभाजीत यादव याची चौकशी केली असता त्याने पळून गेलेल्या सियाराम मोरया, रा. उत्तरप्रदेश, सध्या. रा. सतलोज ढाबा व सुरज पासी, रा. उत्तरप्रदेश यांची नावे सांगितली.
तसेच भोपा गोपा भाई, रा. गुजरात येथील असून अरुण, श्रवण, रा. उत्तरप्रदेश, जुम्मनभाई, रा. मुंबई, विजय रा. सुरत, सलीम, रा. मुंबई, महेश पांडे, रा. कानपूर, अरुण पांडे यांच्या सांगण्यावरुन काळाबाजार करत असल्याची कबुली त्याने दिली.
काळाबाजार केलेला माल हा. जी. जे. 26 टी. 6513 व एम. एच. 15, बी. जे. 2073 वाहनात हॉटेल सह्योग व हॉटेल न्यू कल्याणी (दहिवेल) येथे साठवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथून अक्रम सत्तार पठाण, रा. पचपोरठणा, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश व लालजी सरऊ प्रसाद उपाध्याय, रा. अबरणा जि. बधोई, उ. प्रदेश सध्या रा. हॉटेल सह्योग, कोंडाईबारी यांना ताब्यात घेतले. तेथे काळाबाजारासाठी वापरण्यात येणारे साहित्य त्यात केमिकलने भरलेले ड्रम, प्लास्टिक दाण्याच्या गोण्या, स्टिल, खाद्य तेल जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 84 लाख 28 हजार 318 रूपये इतकी आहे.
याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकाचे पथकातील पोना मनोज दुसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सबजीत रामतिरथ यादव, रमेश लालता सोनखर, इम्रान शेख मोफिजुद्दीन शेख, अक्रम सत्तार पठाण, लालजी सरहुप्रसाद उपाध्याय यांच्यासह 15 जणांवर भादंवि कलम 407, 411, 285, 34 जीवनावश्यक वस्तू अधि. 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत.