
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
बेळगावातील दोघांना उसतोडीसाठी मजुर उपलब्ध करून देण्याचे सांगून तालुक्यातील अजनाळ ते सडगाव रस्त्यावरील निर्जनस्थळी नेवून बेदम मारहाण करुन
त्यांच्याकडील रोख रक्कमेसह एक लाखाचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 16 जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर सतगोंडा खोत (वय 49 रा.आप्पाची वाडी ता.निपाणी जि.बेळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यासह साक्षीदाराला ऊस तोडणीसाठी मजुर उपलब्ध करुन देतो असे सांगुन सुधाकर पवार या इसमाने अजनाळे ते सडगाव रोडवर नाल्याच्या कडेला नेले.
तेथे त्याच्यासह अन्य 10 ते 15 साथीदारांनी दोघांना घेराव घालुन हाताबुक्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील रोख 24 हजार, साक्षीदाराच्या गळ्यातील सोन्याची तीन तोळे वजनाची 60 हजारांची चैन, तसेच 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, उजव्या हातातील 10 हजाराचे चांदीचे ब्रेसलेट आणि साक्षीदाराचा 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 4 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून घेतला.
त्यावरून सुधाकर पवार व त्याचे दहा ते पंधरा साथीदारांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक पी.आर.पाटील करीत आहेत.