
धुळे - प्रतिनिधी Dhule
ऑनलाईन फसवणुकीचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे. या फसवणुकीत १८ बँकेतील २७ खात्यांमध्ये तब्बल २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपयांची फसवणूक झाली आहे.
शहरातील अँक्सिस बँकेत धुळे विकास बँकेचे खाते हॅक करुन ऑनलाईन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या १८ बँकेतील २७ खात्यांमध्ये तब्बल २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करुन फसवणूक झाल्याची घटना ८ जून २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.
तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. दिल्ली येथून नायझेरियन तरुणांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ५ लाख ९८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील आदी उपस्थित होते.