पळासनेरला शस्त्रतस्करी रोखली ; गावठी मशिनगनसह 20 पिस्टल, 280 काडतूस जप्त

पळासनेरला शस्त्रतस्करी रोखली ; गावठी मशिनगनसह 20 पिस्टल, 280 काडतूस जप्त

धुळे । प्रतिनिधी dhule

शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे शस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या एकास ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील पोलिसांनी पकडून त्याच्या जवळून एक गावठी मशिनगनसह 20 पिस्टल, 280 जीवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त केला. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (वय 27, रा. उमर्टी, ता. वरला, जि.बडवाणी) असे संशयिताचे नाव असून, न्यायालयाने त्याला 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.

ठाणे शहरातील वाळगे इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यातील आरोपी सुरजितसिंग उर्फ माजा हा शस्त्रसाठा विक्रीसाठी धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक पाचचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक 5, वागळे ठाणे येथील पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ पळासनेर येथे दाखल झाले. सुरजीतसिंग हा 20 गावठी बनावटीचे पिस्टल, गावठी बनावटीची एक मशिनगन, दोन मॅग्झीन,व 280 काडतुसासह विक्रीसाठी आला असता, पोलिसांनी त्याला 11 जुलै रोजी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे हे करीत आहे. हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार होता याचा तपास पोलिस करीत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन, उपनिरीक्षक सुनील अहिरे, संदीप शिंदे, रोहिदास रावते, सुनील निकम, शशिकांत नागपुरे, विजय पाटील, माधव वाघचौरे, सुनील रावते, विजय काटकर, अजय साबळे, सुनीता गीते यांच्या पथकाने केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com