
धुळे - प्रतिनिधी dhule
शहरातील मोहाडी (Mohadi) उपनगरातील दंडेवाले बाबा नगरात चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून (murder) करण्यात आला. मागील भांडणातून हा हल्ला झाला. त्यात तरुणाच्या आई, भावासह तीन जण जखमी झाले असून या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल विश्वास मरसाळे (वय-25 रा.दंडेवाले बाबा नगर, मोहाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल दि.26 रोजी रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान दंडेवाला बाबा नगर परिसरात रोकडोबा हनुमान मंदीरासमोर ही घटना घडली.
मागील भांडणाची कुरापत काढून सुनिल नंदु आव्हाळे, बबलू नंदू आव्हाळे, दिनेश सुभाष धनगर व सागर नंदु आव्हाळे सर्व (रा.दंडेवाले बाबा नगर, मोहाडी) यांनी अजय विश्वास मरसाळे यांस तुम्ही जातीवाचक बोलून काल तु व जाकीर मंदीरावर असतांना माझ्या भावाशी वाद घातला होता, यापुढे जर तुम्ही नीट वागले नाहीत तर तुम्हाला येथे राहणे मुश्कील करुन टाकू, अशी बोलून त्यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
सागर आव्हाडे याने त्याचे पॅन्टचे खिशातील चाकूने अजय याची आई शोभाबाई तसेच मित्र जाकीर पिंजारी यांच्या डोक्यावर तर भाऊ अमोल विश्वास मरसाळे याच्या डाव्या कानाजवळ वार केला. तसेच त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर भोसकुन त्याचा निर्घुण खुन केला.
या हल्ल्यात अजय विश्वास मरसाळे, शोभाबाई विश्वास मरसाळे, साक्षीदार जाकीर पिंजारी हे तिघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी अजय विश्वास मरसाळे याच्या फिर्यादीवरून वरील चौघावर भांदवि कलम 302, 324, 323, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 चे कलम 3 (1) (आर) (एस), 3 (2) (व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चौघा आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.