धुळ्यात साकारणार 100 बेडचे अद्यावत नेत्ररुग्णालय ; २० रुपयात होणार सर्व शस्त्रक्रिया

हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ.खान यांची माहिती
धुळ्यात साकारणार 100 बेडचे अद्यावत नेत्ररुग्णालय ; २० रुपयात होणार सर्व शस्त्रक्रिया

धुळे - dhule

येथील हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government and Medical Colleges) आवारात दोन एकरमध्ये 100 बेडचे अद्यावत रुग्णालय (Hospital) उभारण्याचा प्रस्ताव असून त्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. ते पुढील दोन वर्षात साकार होणार असून आता डोळ्यांच्या अवघड शस्त्रक्रियांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. धुळ्यात अवघ्या २० रुपयात रुग्णावर नेत्रशस्त्रक्रियेपासून नेत्रविकारांवर उपचार केले जातील, अशी माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा नेत्रविभाग प्रमुख डॉ.मुकर्रम खान (Dr. Mukarram Khan) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे (Dr. Arun More) देखील उपस्थित होते. डॉ.मुकर्रम खान यांनी सांगितले की, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचा नेत्र विभाग विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मध्यप्रदेशसह (Madhya Pradesh) आजू-बाजूच्या जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. येथील रुग्णालय प्रशासनावर भारही पडतो,मात्र तो भार सोसुन आम्ही रुग्णसेवा देत असतो. डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रियेसाठी अनेक रुग्ण मोठ्या शहरांमध्ये जातात. त्यामुळे धुळ्यातच रुग्णांवर उपचार व्हायला हवे,हा विचार मनात ठेवून या रुग्णालयातच खाजगी सारख्या सुविधा असणारे सुसज्ज असे शासकीय स्वतंत्र नेत्र रुग्णालय उभारता येईल का? या प्रश्‍नाला सहकारी डॉ.गवई, विजयश्री धोंडे यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेतून 100 बेडचे नेत्र रुग्णालय उभारण्याची संकल्पना आली. त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.तत्कालीन अधिष्ठाता पल्लवी साबळे यांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रकल्पाची वास्तु विशारद कडून मंजुरी घेतली. हिरे महाविद्यालयच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाबाहेर विहिरीलगतची जागा यासाठी निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकल्पाला शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे. टेंडर प्रक्रिया बाकी आहे.

गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अनेक अडथळे आले. ते अडथळे दुर करत आता रुग्णालय उभे राहिल, अशी स्थिती निर्माण झाली. सुमारे ६५ कोटी ३९ लाख रुपये या नेत्र रुग्णालयाच्या इमारतीचा खर्च अंदाजीत आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आम्हाला नक्कीच मिळतील त्यासाठी निधीही असेल. त्यामुळे त्याची काळजी नाही.डोळ्याच्या आकाराची इमारत असून ऑप्टीक नव्ह मधून रुग्णालयात एन्ट्री होईल.

स्वतंत्रपणे नेत्ररुग्णालय उभे राहिल्यानंतर त्यात तज्ञ डॉक्टरांची कमतरता पडणार नाही, नेत्र विभागात काम करणार्‍या अनेक तज्ञ डॉक्टरांविषयी संपर्क केला जाईल. अवघ्या २० रुपयात शस्त्रक्रिया देखील येथे होवू शकेल. याच नेत्र रुग्णालयाच्या इमारतीत नेत्र विभागात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची सोय होईल. पी.जी.चे विद्यार्थी देखील त्यामुळे वाढतील असेही डॉ.खान यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com