
शिरपूर - Dhule - Shirpur - प्रतिनिधी :
राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, जाफरानी जर्दा व विदेशी सिगारेट यांची वाहतूक शिरपूर पोलिसांनी रोखली असून कंटेनरसह 44 लाख 84 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
दहिवद गावाकडून शिरपूर शहराकडे कंटेनर (क्र.आरजे 52 जीए 3631 मधून सुगंधी तंबाखू, पानमसाला, सिगारेट, जर्दा यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोनि हेमंत पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि.1 ऑगस्ट रोजी दुपारी 2.45 वाजता पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा लावला. त्यावेळी कंटेनर महामार्गावरुन जातांना पथकाला आढळून आले.
पथकाने कंटेनरची तपासणी केली असता त्यात सुगंधी तंबाखू, जाफराणी जर्दा व विदेशी सिगारेट मिळून आले. या मालाला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध घालण्यात आले आहे. तरी देखील वाहतूक केली जात होती. त्यामुळे पथकाने 44 लाख 84 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात सात लाख 83 हजार 360 रुपयांचे प्लॅस्टीकच्या गोणीत वाणी प्रिमिअम, वाणी ग्रुप्स, एमपी एन्टरप्रायझेस असे लिहिलेले होते. आठ लाख सहा हजार 400 रुपये किंमतीची सिगारेट, पाच लाखांचे सिगारेट, तीन लाखांचे जाफराणी जर्दा, 94 हजार 500 रुपये किंमतीचे जाफराणी दर्जा व दोन लाखांचा कंटेनर यांचा समावेश आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, सपोनि चंद्रकांत पाटील, उपनिरिक्षक किरण बार्हे, सागर आहेर, संदीप मुरकुटे, पोहेकॉ उमेश पाटील, पोकॉ समीर पाटील, संदीप रोकडे, भरत चव्हाण यांच्या पथकाने केली.
कंटेनर चालकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात
पोलीस पथकाने कंटेनर चालक बरकत अली इन्साफ अली रा. ओरीपूर, उत्तरप्रदेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भादंवि 328, 272, 273 सह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 चे कलम 7 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालकाची चौकशी सुरु असून त्यातून सदर माल कोणाचा हा उलगडा होणार आहे.