शिंदखेड्यात एटीएम फोडून 36 लाखांची रोकड लंपास

36 तासानंतर घटना उजेडात, तीन ते चार चोरटे सीसीटीव्हीत कैद
शिंदखेड्यात एटीएम फोडून 36 लाखांची रोकड लंपास

शिंदखेडा । Shindkheda । प्रतिनिधी

शहरातील रहदारीच्या शिरपूर रोड लगत असलेल्या स्टेट बँक शाखेचे (State Bank Branch ATM) एटीएम फोडून (Bursting) चोरट्यांनी (thieves) तब्बल 36 लाखांची रोकड लंपास करून पोलिसांना (Police) तपासाचे खुले आव्हान (challenge) दिले आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तीन ते चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

दरम्यान दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी बँक कर्मचारी पगारे यांना मुख्य कार्यालयातून एटीएम का बंद आहे, असा संदेश आला. मात्र त्यावर लक्ष देण्यात आले नाही. सुमारे 36 तास उलटल्यावर एटीएम फोडल्याबाबत माहिती शिंदखेडा पोलिसांना देण्यात आली. आज दुपारी एक वाजता घटना समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची भेट-

घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पीआय सुनील भाबड यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, पीएसआय राजगुरू, एपीआय योगेंद्र राजपूत, एलसीबीचे पीआय शिवाजी बुधवंत, पीएसआय केदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

चोरट्यांनी केला वाहनाचा वापर-

घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. श्वान रॉकीने एटीएमपासून फक्त शंभर फुटापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. चोरट्यांनी तेथे वाहन उभे केले असावे व त्याद्वारे ते पसार झाले असावे असा तर्क पोलिस अधिकार्‍यांनी लावला.

चोरटे सीसीटीव्ही-

पोलिसांनी तपासाला वेग दिला असून प्रथम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात तीन ते चार व्यक्ती अंगावर जॅकेट, डोक्यावर कानटोपी परिधान केलेल्या अवस्थेत दिसून येत असून मात्र चेहरे झाकलेले दिसून येत आहेत.

कटरचा वापर-

चोरट्यांनी एटीएम मशीन इलेक्ट्रिक कटरने तोडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी आधी सर्व सीसीटीव्ही कनेक्शन कट केले आहे. विशेष म्हणजे बँकेच्या अलार्म वायरही कट केली आहे.

39 लाखांची रोकड-

बँक व्यवस्थापक अविनाश पगारे यांनी शिंदखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. एटीएममध्ये शुक्रवारी सुमारे 39 लाख रुपये टाकण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 36 लाख 86 हजार 500 रुपये लांबवण्यात आले. शनिवार दुसरा लगत रविवार सुटी असल्याने ही रोकड टाकण्यात आली होती, अशी माहिती बँक अधिकार्‍यांनी दिली. सुमारे दोन ते अडीच लाख रुपये एटीएम धारकांनी काढले असावे, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

अधिकारी मुख्यालयी नसतात-

धाडसी चोरीत 36 तास उलटूनही बँक सेवकांना पत्ता लागला नाही. सुटी असली म्हणजे कोणीही सेवक वर्ग मुख्यालयात रहात नाही. बँक अधिकार्‍यांना मुख्यालय सोडण्याची परवानगी असते काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सुरक्षा रक्षकाविना एटीएम-

स्टेट बँकेला रात्र पाळीत सिक्युरिटी गार्ड राहत नाही. आरबीआयच्या धोरणामुळे सिक्युरिटी गार्ड दिला जात नाही, असे म्हटले जाते. लाखोंचा व्यवहार यासह बँंकेत लॉकर आहेत. मात्र असे असताना सिक्युरिटी गार्ड न नेमणे म्हणजेे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्र पाळीसाठी सिक्युरिटी गार्ड असावा. जबाबदार अधिकार्‍यांनी मुख्यालय विना परवानगी सोडू नये. एटीएम फोडून 36 तास उलटून गेले तरीही घटना संबंधितांना कळली नाही. याबाबत चौकशी व्हावी. पोलीस गस्तबाबत रोज हजेरी असणे बंधनकारक करावे. दि. 12 रोजी रात्री पेट्रोलिंगची कोणाची जबाबदारी होती. ते बँकेत परिसरात गेले होते का, असे प्रश्न उपस्थित होत असून याची चौकशी करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com