30 टक्के कृषी योजना महिलांसाठी राखीव

कृषी मंत्री दादा भुसे : धुळ्यात राज्यस्तरीय महिला किसान दिन साजरा, कृषी वस्तूंचे प्रदर्शन
30 टक्के कृषी योजना महिलांसाठी राखीव

धुळे Dhule । प्रतिनिधी

कोरोना (Corona) विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही (adverse conditions) शेतकरी (Farmers) खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकर्‍यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणार्‍या महिलांसाठी (Women) कृषी विभागाच्या योजना (Department of Agriculture) 30 टक्के राखीव (reserved) असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी आज येथे केले.

राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आ.मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.चिंतामणी देवकर, सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.बी. जोशी, डॉ.तुळशीराम गावित, प्रगतिशील महिला शेतकरी चंद्रकला वाणी, शोभा जाधव, प्रियांका जोशी, वंदना पाटील, भारती भदाणे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले, कृषी योजनांमध्ये महिला शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ-मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे.

विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत एक हजार रोपवाटिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेत महिलांनी शेतकर्‍यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून द्यावीत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे.

राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावरील प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगामी काळात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना तातडीने मान्यता देण्यात येईल.

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे दिवाळीपूर्वी वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 31 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला शेतकर्‍यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. महापौर श्री.कर्पे, जिल्हाधिकारी शर्मा यांनीही मनोगत मांडले. आ.गावित म्हणाल्या, भारत कृषी प्रधान देश आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला शेतीत राबतात.

त्यामुळे राज्य शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी धुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध पदार्थ, साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com