दोंडाईचातील गुंतवणूकदारांना दीड कोटीत गंडा

दोंडाईचातील गुंतवणूकदारांना दीड कोटीत गंडा

सुरतच्या चौघांसह सहा जणांवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

धुळे । Dhule

आकर्षक व्याज आणि आमिष दाखवून फर्मच्या माध्यमातून दोंडाईचातील गुंतवणूकदारांची तब्बल दीड कोटी रूपयात फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधीत फर्मच्या सुरत येथील संचालकांसह सहा जणांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

याबाबत रविंद्र निंबा नेरकर (वय 42 रा.राणीपुरा, गणपती मंदिराजवळ, दोंडाईचा) या व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल सर्व (रा.सुरत) यांनी शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हाजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाऊंडर, डेलीगेट या फर्मची स्थापना केली.

त्याची मंगेश नारायण पाटील, आकाश मंगेश पाटील (रा. रा.जयहिंद कॉलनी, दोंडाईचा) यांच्या माध्यमातून जाहिरात करून फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास प्रति महिना आठ ते नऊ टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील, असे आमिष देवून ठेवीदारांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र गुंतवणूकीचे परतावे परत न करता खोटी माहिती देवून यात फिर्यादीसह गुंतवणुकदारांची तब्बल 1 कोटी 40 लाख 50 हजार 508 रूपयांची फसवणूक केली.

हा प्रकार 2019 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी फर्मच्या सुरत येथील चौघांसह दोंडाईचातील दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com