खानापूरचे माजी सरपंच बाळासाहेब आदिक यांचे अपघाती निधन

0
अपघातात कारचा झालेला चक्काचूर
माळवाडगाव (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावचे माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब रामचंद्र आदिक (वय-47) यांचे श्रीरामपूरहून घरी जाताना माळवाडगाव शिवारात खानापूर रोडवर कारचा टायर फुटल्याने अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
काल बुधवारी रात्री बाळासाहेब आदिक हे आपल्या स्विप्ट डिझायर (एमएच-17-एई-355) या कारने श्रीरामपूरहून खानापूरकडे घरी जात होते. माळवाडगाव शिवारात कार वेगात असताना अचानक कारचा टायर फुटल्याने तिचा तोल जाऊन उजव्या बाजूने कारने तीन पलट्या घेतल्या. त्यामुळे कार ओढ्याच्या उंच भरावर चढली. कार उलटताना नेमके चालकाच्या दरवाजातून बाळासाहेब आदिक बाहेर फेकले जाऊन कारखाली दबले गेले.
त्यांच्या छातीवरून कार उलटली होती. अवघ्या दहा फुटांवर भडांगे यांचे राहते घर, गाई, गुरे होती. त्यामुळे कार उलटल्याचा आवाज येताच भडांगे घराबाहेर आले. शेजारच्या शेतातील बाबा साळवेही मदतीला धावले त्यांनी या घटनेची माहिती गावातील सुरेश आढाव यांना कळविली. ते घटनास्थळी दाखल झाल्यावर चौघांनी कार बाजूला करून बाळासाहेबांना बाहेर काढले. त्यांनी तातडीने बाळासाहेब आदिक यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाळासाहेब आदिक यांचे शिक्षण श्रीरामपूर येथे मामा यादवराव लबडे यांच्याकडे झाले होते. त्यामुळे श्रीरामपुरात त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांनी खानापूर गावाचे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळले होते. ते सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार असून श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र आदिक यांचे ते थोरले बंधू होत. काल दुपारी खानापूर येथे गोदातिरी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

 

LEAVE A REPLY

*