Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

‘तोच पिता वास्तव ठरतो… जन्म देई तो निमित्त केवळ!’

Share

जळगाव  –

‘नाथाभाऊंनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले, पण कधी मुलगा मानलं नाही’. अशी खंत व्यक्त करुन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातली सल भुसावळमध्ये बोलून दाखविली आणि एकनाथराव खडसे हा राजकारणातला बाप माणूस असल्याची जाहीर कबुलीच त्यांनी दिली. मात्र हा बापमाणूस सभोवताली असलेल्या ‘कानफुक्यांनी’ परेशान असल्याची व्यथा सांगायला ते विसरले नाहीत.

एकनाथराव खडसे यांनीही गुलाबरावांच्या या विधानाची दखल घेत आपण जिल्ह्यातील गुलाबरावच नव्हे तर अनेकांवर पुत्रवत प्रेम केले. पण ते मुलांना कधी कळलेच नाही. राजकारणात आपण सर्वांनाच समान न्याय देत प्रत्येकाला मोठे करण्याचे काम केले, असे ते म्हणाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पिता-पुत्राच्या विधानावरुन जिल्ह्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले. आणि राजकारणातल्या पिता-पुत्रांच्या आठवणी ताज्या झाल्या. राज्यसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरलाल जैन यांनी माजी मंत्री गिरिष महाजन यांना आपला मोठा मुलगा असल्याचे अनेकवेळा जाहीर केले आहे. आणि गिरिषभाऊंनीसुध्दा बाबूजींच्या पितृतुल्य आणि वडिलकीचा नेहमीच गौरव केला आहे. तसं पाहिलं तर राजकारणात पिता-पुत्र, काका-पुतणे, बाप-लेक असे अनेक नेते सक्रिय आहेत. मात्र जळगावच्या या पिता-पुत्रांच्या राजकीय प्रेमाला वेगळीच झालर आहे. मध्यंतरीच्या कालखंडात जिल्ह्यात झालेल्या बंडखोरीवरुन वेगळे चित्र निर्माण झाले होते. मात्र जळगाव ग्रामीणच्या मतदार संघात इच्छा असूनही नाथाभाऊ आपल्या या मानलेल्या मुलासाठी काही करु शकले नाही. ज्या गुलाबरावांना त्यांनी जिल्हा परिषदेपासून मंत्रीमंडळापर्यंत सोबत नेले. त्यांच्या मागील निवडणुकीत मात्र नाथाभाऊंना प्रचाराला जाता आले नाही. कारण स्वतःच्या मुलीचे अस्तित्व प्रतिष्ठेला लागले होते. त्या ठिकाणीही भाऊंच्या काही ‘सवाई बेट्यांनी’ बापालाच अडचणीत आणले होते.

पक्षातील काही फितुर आणि गद्दारांमुळेच पराभव झाल्याची खंत ते अधूनमधून व्यक्त करीत असतात. त्यामागे त्यांनीच मोठे केलेल्या त्यांच्या काही मानसपुत्रांचे कारनामे कारणीभूत असल्याचे ते देखील खाजगीत मान्य करतात. असं म्हणतात, ‘यशाला खूप बापं असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात’ म्हणून राजकारणातल्या या पिता-पुत्रांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ‘या बाप-लेकांचा सूर कधी जुळला नाही सुराला आणि जीव लावणं कळलं नाही त्या मानलेल्या पोराला’.
बापापेक्षा वडीलकी श्रेष्ठ असते आणि बापाने कर्तव्य आणि जबाबदारीतून ती सिध्द केलेली असते. चारचौघात आपला मुलगा व्यवहारी म्हणून नावलौकीकास यावा हे प्रत्येक बापाला वाटत असते. म्हणून कयामतमधला तो मुलगा बापासाठी म्हणतो. ‘पापा कहते है बडा नाम करेगा, बंदा ये खुबसुरत काम करेगा दिलकी दुनिया मे अपना नाम करेगा।’
अमळनेर तालुक्यात माजी आमदार आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बी.एस. पाटील हे असेच पितृतुल्य व्यक्तीमत्व त्यांनीही विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांना मानसपुत्र मानले आहे. अमळनेर तालुक्यात मागील काळात या पिता-पुत्राची मैत्री जाहीर कार्यक्रमातून दिसली आहे. राजकारणात नव्याने येऊ घातलेल्या पिढीने उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या अनेक बाप माणसांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. आधी उमेदवारी नाकारली नंतर उमेदवार यादीतून नाव वगळले, मुलीला तिकीट देऊन बापाला घरी बसविण्याचा प्रयत्न झाला. आज तोच बाप माणूस मुलीच्या पराभवाचे चिंतन करत पक्षातल्या गद्दारांवर कारवाई करण्याची मागणीसाठी हतबल आहे. आणि ‘बाप से बेटा सवाई’ होऊ पाहणार्‍या मुलाची मात्र सत्ता गेल्याने अवस्था बिकट झाली आहे. हा सगळा काळाचा महिमाच म्हटला पाहिजे.
गेल्या काही वर्षांपुर्वी दुरदर्शनवर सवाई माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित स्वामी या मालिकेच्या शिर्षक गीतात असे म्हटले आहे की,

‘जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो, धारण करतो
तोच पिता वास्तव ठरतो,
जन्म देई तो निमित्त केवळ’

खरे म्हणजे बाप कधी बाप होतो. आपल्या बाळासाठी गाण गातो. धडपडणार्‍या पोरांसाठी आधाराचा हात होतो. कधी काळी पाठीवरती शाबासकीची थाप होतो. असा हा राजकारणातल्या मानस पिता-पुत्रांचा मामला असतो असे म्हणायचे आणि पुढे जायचे. एवढे मात्र खरे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!