नगरनजीक घर पेटले : दाम्पत्य अत्यवस्थ

0
पेट्रोल व रॉकेलच्या साठ्यामुळे आग लागल्याचा संशय
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथ्ील आलमगीर मध्ये घरातील रॉकेल व पेट्रोलच्या भरलेल्या ड्रममुळे घरात आग लागून पतीपत्नी गंभीर भाजल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात अजहर मंजूर शेख (वय 30) व गुरीया अजहर शेख (वय 25) हे दोघे अत्यवस्थ असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हा गॅसटाकीचा स्फोट नसून हा घातपात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली आहे. या आगीनंतर घरातील सर्व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तर वेळीच अग्नीशमन दलाने आग विझविली असून रात्री बॅाम्ब शोधक पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शेख दाम्पत्य घरात होते. घरात अचानक आग लागल्यामुळे दोघांची धावपळ सुरू झाली. मात्र घराला कडी लावल्यामुळे तत्काळ बाहेर पडणे शक्य झाले नाही. तसेच घर आयताकृती असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. दोघांना पळण्यासाठी जागा राहीली नाही.
त्यामुळे शेख दाम्पत्य घरात अडकून राहिले. बराच वेळेनंतर हा प्रकार शेजारी राहणार्‍यांच्या लक्षात आला असता त्यांनी आरडाओरड केली. अचानक लागलेली आग म्हणजे गॅस टाकीचा स्फोट झाला असावा अशी शंका वर्तविण्यात आली.
हा संदेश सोशल मीडीयाच्या माध्यमातून सर्वत्र पसरला. भिगार येथे स्फोट झाल्याचे समजताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या जवानांनी आग विझवून दोघांना बाहेर काढले. शेख दाम्पत्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरीया शेख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक कौलास देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील गॅस टाकी शाबुत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मग हा प्रकार घडला कसा हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
त्यामुळे शर्मा यांच्या आदेशाने बॉम्ब शोधक पथकास घटनास्थळी रवाना करण्यात आले. श्वानच्या माध्यमातून काही संशयीत वस्तू मिळतात का याची तपासणी करण्यात आली. मात्र अशी एकही वस्तू पोलिसांच्या हाती आली नाही.
मात्र घरात काही रॉकेल व पेट्रोलचे ड्रम मिळून आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांच्या नजरेत भरला आहे. हा प्रकार नेमका कसा घडला. याची उकल करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच काही नमुने देखील घटनास्थळाहुन हस्तगत केले आहे. घटनेचे खरे कारण तपासात निष्पन्न होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
गॅस टाकीची अफवा – 
रात्री 10 वाजता आलमगीर येथे गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मात्र गॅसटाकी सुरक्षीत असल्याचे लक्षात येताच पोलीस, बॉम्ब शोधक पथके, अग्नीशामक दल, गुप्त शाखा यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कोणतीही संशयीत वस्तू पोलिसांच्या हाती आली नाही. यापूर्वी मुकुंदनगर ये्थे बॉम्बच्या गुन्ह्यात असेलेले आरोपी सापडलेले आहेत. या घटनेत बहुतांशी गुन्हेगारी व्यक्तीकडून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गॅसटाकीचा स्फोट ही केवळ अफवा असून सत्य घटनेचा तपास सुरू आहे.
घातपाताचा दृष्टीने तपास सुरू – 
पोलिसांना घरात पाच रॉकेल व पेट्रोलचे ड्रम मिळून आले आहे. घरात गॅसगीझर आहे. गॅसटाकी आहे. तरी देखील इतका मोठा ज्वलनशील साठा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच घरात मिळून आलेले ड्रम हे मोकळे आहेत. त्यातून रॉकेल, पेट्रोलचा वास येत आहे. त्यामुळे ही घटना नैसर्गिक नसून घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. तर घटनेच्या आधीच घरात रॉकेल व पेट्रोल पांगलेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता यात आरोपी कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*