Thursday, May 2, 2024
Homeनाशिककेळझर धरण तुडुंब

केळझर धरण तुडुंब

डांगसौंदाणे । निलेश गौतम

बागलाण तालुक्याच्या पश्चिम खोर्‍यास वरदान ठरलेले केळझर ‘गोपाळसागर’ धरण आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर तुडुंंब भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाणी आरम नदीपात्रात वाहू लागताच शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

सिंचनासह सुमारे 25 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना केळझर शंभर टक्के भरल्याचा लाभ मिळणार आहे. काल केळझर धरणात 97 टक्के पाणीसाठा झाल्याने पश्चिम खोर्‍याचे लक्ष धरण केव्हा भरते याकडे लागले होते. आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर केळझर तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी आरम नदीपात्रात कोसळू लागले.

पश्चिम भागातील डांगसौंदाणेसह ततानी, साकोडे, बुंधाटे, करंजखेड, दहिंदुले, निकवेल, डांगसौंदाणे, मुंजवाड, मळगाव, आराईसह सटाणा शहराला या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.तर डाव्या कालव्याद्वारे कर्‍हाळेपाडा, भिलदर, वटार, विरगाव, किकवारी, जोरण, कपालेश्वर, वनोली आदी गावांना रब्बीच्या हंगामासाठी फायदा होत असल्याने धरणाकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागून होते.

धरण भरल्याचे वृत्त पश्चिम खोर्‍यात पसरताच गावागावात समाधानाचे वातावरण पसरले आहे. धरणाला असलेल्या एकमेव डाव्या कालव्याव्दारे पाणी दिले जात असल्याने रब्बीचे सुमारे 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे सुमारे दोन हजार हेक्टर जमीनीस रब्बी हंगामात लाभ मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

केळझरवर सुमारे 20 ते 25 गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. धरण भरल्याने या गावातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. गतवर्षी 3 ऑगस्टला केळझर भरले होते. यंदा मात्र 22 ऑगस्टला भरले आहे. धरणातून सद्यस्थितीत 75 क्युसेस पाण्याचा विसर्ग आरम पात्रात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या