आपली ती जनभावना, दुसर्‍यांची ती दहशत ! : शिवसेना मंत्री शिंदे

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी केलेला रास्तारोको, पोलिसांवर झालेली दगडफेक, वाहनांचे नुकसान.. याला शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना जबाबदार धरायला तयार नाहीत. उलट त्यांनी हा जनभावनेचा उद्रेक असे गोंडस नाव देत त्याचे समर्थन केले आहे. दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर एसपी कार्यालयातील तोडफोडीला त्यांनी दहशत असे संबोधून आपली ती भावना अन् दुसर्‍यांची दहशत असे अजब तर्कट काढले आहे.

केडगाव हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या दशक्रिया विधीनंतर मंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ज्या प्रकारे ठुबे व कोतकर यांची हत्या झाली ती घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हे हत्याकांड भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व काँग्रेस,राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकार्‍यांनी संगनमताने घडून आणले आहे. या घटनेतील आरोपींची कसून चौकशी करून त्यांचे फोन डिटेल्स तपासल्यास अनेक बडे प्रस्थ समोर येईल. शहरातील उद्योगपती बाळासाहेब पवार यांनी स्वत:हून आत्महत्या केल्यानंतर मागे सोडलेल्या चिठ्ठीत अनेक नेत्यांची नावे आहेत. केडगाव हत्याकांडाच्या कटातील आरोपी त्याच्याशी संबंधित असल्याचा आरोप मंत्री शिंदे यांनी केला.

हत्याकांडानंतर पुरावा नष्ट होऊ नये, तत्काळ पंचनामा करावा, फरारी आरोपींना अटक करावी अशी मागणी शिवसेनेने तत्काळ केली. त्यातून जनभावना उसळली. त्यातच पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे 308 कलम लावण्याची गरज नव्हती. हत्याकांडातील फरारी आरोपींचा अगोदर शोध घ्यावा, शिवसैनिकांना फरार होण्याची गरज नाही. पोलिस सांगतील तेव्हा ते स्वत:हून पोलीस ठाण्यात हजरी होतील. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी याची गंर्भीयाने दखल घेतली आहे. आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असे सांगत त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी, काँग्रेसची शहरात किती दहशत आहे त्याची प्रचिती एसपी ऑफिसवरील दगडफेकीतून दिसून येते. दगडफेकीच्या कटात आणखी कोण-कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा. केडगावात कोणाची किती दहशत होती, हे सर्वश्रृत आहे. केडगावातील कोतकर-कर्डिले यांच्या दहशतीची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. त्याविरोधात स्थानिक शिवसैनिकांनी उभारलेल्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी पक्षप्रमुखांसह शिवसेना नेते 25 तारखेला नगरला येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मीही दहशती विरुद्ध लढेन : अनिता ठुबे
कर्डिले-कोतकर यांनी केडगावात अनेक कुटुंब उध्दवस्त केली. माझे पती वसंत हे शिवसेनेसाठी शहीद झाले. त्यांच्या मारेकर्‍यांना सोडू नका. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी मी खंबीरपणे लढा देईल. त्यांना फाशीपर्यंतपोहचविण्यासाठी प्रयत्न करेल असा अक्रोश मृत वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता यांनी शिंदे यांच्यासमोर केला. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पाठीशी असून पक्ष कुुटुंबाची जबाबदारी घेईल असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

*