केडगाव दुहेरी हत्याकांड : शिवसेनेची भोकाडी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – दगडफेकीबद्दल दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी (17 एप्रिल) सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करून स्वतःला अटक करवून घेण्याचे शिवसेनेने जाहीर केलेले आंदोलन अखेर स्थगित केले आहे. 15 एप्रिल रोजी जिल्हाव्यापी मोर्चा अन् त्यानंतर ‘वर्षा’वरील आंदोलनाही स्थगित केल्याने शिवसेना आंदोलनाचा भोकाडी करत असल्याची टीका सुरू झाली आहे.

संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांचा खून झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते मिळून तब्बल सहाशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शिवसैनिकांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनी तसे आश्वासनही दिले, मात्र याबाबतची कार्यवाही झाली नाही. त्यानंतर शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती.

उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी ठाकरे यांना भेटून बाजू मांडली. दोन शिवसेना कार्यकर्त्यांचा खून झाल्यानंतरही शिवसेनेने संयम पाळला, जिल्हा बंदमध्येही अनुचित घटना घडली नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांनी मंगळवारी (17 एप्रिल) मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर ठिय्या मांडा व स्वतःला अटक करवून घ्या, असा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. सोमवारी कोतकर व ठुबे यांचा दहाव्याचा विधी झाल्यानंतर दुपारी मुंबईला निघण्याचे ठरले होते.

पण दहाव्याच्या विधीला आलेले मंत्री शिंदे यांनी सर्वांच्या भावना जाणून घेऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटून त्या सांगितल्या. त्यांनी आश्वासन दिल्याने शिंदे यांनी जिल्ह्यातील नेत्यांना ‘वर्षा मोर्चा’ स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्याची तयारी थांबवली. 25 तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगरला येऊन कोतकर व ठुबे कुटुंबांना भेटणार आहेत. तोपर्यंत गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर मुंबईत आंदोलन केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*