
नाशिक । जम्मु काश्मिर येथे आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आज शहरात विविध ठिकाणांवरून कँडलमार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. यातून शहरात ठिकठिकाणी आज मुक हुंकार उमटला.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील प्रवेशद्वाराजवळ असिफाची प्रतिमा उभारण्यात आली होती. याठिकाणी असिफाला न्याय द्या असा आशय असलेले फलक घेऊन बालिका उभ्या होत्या. यावेळी महाविद्यालयीन युवक युवतींनी आपले अनुभव कथन करत काही घटना घडण्यापुर्वीच सर्व समाजाने दुष्कृत्ये रोखण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन केले.
तसेच महिला संरक्षणासाठी कडक कायदे अंमलात आणावेत अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. यानंतर जमलेल्या नागरीकांनी मेणबत्त्या पेटवून तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करणारे, तसेच न्याय मागणारे फलक घेऊन कँडलमार्च काढला.
हा कँडलमार्च हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून निघून चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नल, त्र्यंबकनाका मार्गे पुन्हा अनंत कान्हेरे मैदानावर आला. या ठिकाणी असिफाला दोन मिनीटे शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मोर्चामध्ये 1 ते 5 वर्षांच्या बालिकांचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचा संकल्प यावेळी केला. या कँडल मार्चमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांतील युवक, युवती, विविध शाळांमधील मुली, शहराच्या विविध भागातील जागृक नागरीक, महिला पुरूषांचा मोठा सहभाग होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ताहेर काचवाला व सोनाली शेलार यांच्यासह त्यांच्या नेटीझन्सच्या एका ग्रुपने प्रयत्न केले.
भोसला मिलटीरी स्कुल येथून मानव उथ्थान मंच व नागरीकांनी कँडलमार्च काढत या घटनेचा निषेध नोंदला.
जुने नाशिक परिसरातील द्वारका येथील शहिद भगतसिंग चौक येथून कँडलमार्चला सुरूवात झाली तो बागवानपुरा, चव्हाटा, अझादचौक, बडी दर्गाह, शालिमार मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून त्यांची सांगता झाली. मुंबईनाका परिसरात किनारा हॉटेल येथून सुरू झालेला कँडलमार्च मुंबईनाका सर्कल गोलाकार फिरून वासनआय केअर येथे याची सांगता झाली. याद्वारे नाशिककरांनी असिफाला श्रद्धांजली अर्पण करत न्याय मिळण्याची मागणी केली.
मीही एक मुलीचा बाप : मीही एका मुलीचा बाप आहे. माझ्या मुलीचे संरक्षण व्हावे असे मलाही वाटते. जम्मु काश्मिरची ही घटना अतिशय वाईट आहे. यासाठी पायाने अपंग असतानाही मी या मोर्चात सहकुटुंब सहभागी झालो आहे. केंद्रातील सरकारकडे स्पष्ट बहूमत आहे. त्यांनी याचा फायदा घेत मुलींच्या संरक्षणासाठी कडक कायदा करावा अशी अपेक्षा आहे.
– मोहम्मद बोरा, नागरीक
मानवाधिकार परिषेदेकडून पार्थना : गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात परिषदेच्या वतीने मेणबत्त्या पेटवून पीडितेसाठी प्रार्थना करण्यात आली.जम्मू काश्मिर येथील कठुआतील आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर आठ दिवस बलात्कार करणार्या नराधमांना तातडीने शिक्षा द्यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तसेच पीडितेस न्याय देण्याची मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी परिषदेचे सुनील परदेशी, शरद केदारे, उषा गवई, संध्या राजपूत, सुषमा बोराडे, सविता खंदारे, आरती निकम, समर शेख आदी उपस्थित होते.